|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मतभक्तीपोटी काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवलं!

मतभक्तीपोटी काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवलं! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप : बाटला हाउसमधील हुतात्म्यांचा काँग्रेसकडून अपमान

वृत्तसंस्था/ अररिया

 निवडणूक प्रचारादरम्यान हवाई हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारून दाखवाच, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील अररिया येथील सभेत बोलताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांना दिले आहे. बाटला हाउस चकमकीबद्दल काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते, तेव्हा हुतात्मा जवानांचा अपमान झाला नव्हता का? मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काँगेसने पाकिस्तानवर कारवाई करण्याऐवजी हिंदूंना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मोदींनी यावेळी केला आहे.

दिल्लीच्या बाटला हाउसमध्ये आमच्या शुरांनी दहशतवादाचे एक मॉडय़ूल नष्ट केले होते, तेव्हा दहशतवाद्यांवरील कारवाईने आनंदी होण्याऐवजी काँग्रेसच्या मोठमोठय़ा नेत्यांच्या डोळय़ात अश्रू तरळले होते. बाटला हाउसमध्ये दहशतवाद्यांना घरात घुसून मारणाऱया हुतात्म्यांचा काँग्रेसने अपमान केला होता. यामागे काँग्रेसचे मतभक्तीचे राजकारण होते, असा शाब्दिक हल्ला मोदींनी चढविला आहे. भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्या विधानानंतर काँग्रेसने भाजपवर हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. अररिया येथील सभेत बाटला हाउसचा केलेला उल्लेख त्याच आरोपाला प्रत्युत्तर असल्याचे मानले जातेय.

विरोधकांचे चेहरे पडले

निवडणुकीपूर्वी हवाईहल्ल्याचे पुरावे मागणाऱया लोकांचे चेहरे दोन टप्प्यातील मतदानानंतर उतरले आहेत. किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा मागणे त्यांनी थांबविले आहे. हिंदुस्थानच्या मतदारांनी पहिल्या आणि दुसऱया टप्प्याच्या माध्यमातून अशा लोकांच्या तोंडाला कुलूप लावले आहे. आता निवडणूक प्रचारावेळी हवाईहल्ल्याबद्दल प्रश्न विचारून दाखविण्याचे आव्हान विरोधकांना देत असल्याचे मोदी म्हणाले.

काँग्रेसला मतभक्ती महत्त्वाची

कोणत्याही जात-धर्मापूर्वी आम्ही भारतीय आहोत. भारतमातेची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे. सत्तेचा भोग आणि परिवाराचा विकास हेच लक्ष्य असते, तेव्हा फाटाफूटच होते आणि बिहारमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे. 26/11 हल्ल्यावेळी आमच्या सैनिकांनी पाकिस्तानवर हल्ल्याची अनुमती मागितली होती, पण काँग्रेसने मतभक्तीला महत्त्व देत सैन्याचे हात बांधून ठेवले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्याऐवजी हिंदूंना दहशतवादाशी जोडल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

 

मतपेढीसाठी तृणमूलच्या प्रचारात विदेशींचा सहभाग

बुनियादपूर : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मतपेढी आणि तुष्टीकरणासाठी अन्य देशांच्या लोकांना बोलावून निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. जनतेसोबत गुंडगिरी करणे, त्यांचे पैसे लुटणे, विकास रोखण्याचा परिणाम काय असतो हे स्पीडबेकर ममता दीदींना 23 मे रोजी समजणार असल्याचे मोदींनी प्रचारसभेत म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये गरिबांना गरीब ठेवण्याचे षड्यंत्र आहे. गरिबांची कमाई तृणमूलचे नेते लुटतात, राज्यात पूजा करणे, मिरवणूक काढणे देखील अवघड ठरले आहे. स्वतःची तिजोरी भरणे तसेच मतपेढीकरता ममता दीदी कोणतीही पातळी गाठण्यास तयार आहेत. हेच मॉडेल ममता बॅनर्जी देशभरात लागू करू पाहत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.

ममतादींदीची झोप उडाली

तृणमूलच्या गुंडांच्या कारवायानंतरही आमच्या बंधूभगिनींनी मतदान केले आहे. बंगालमध्ये पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील मतदानाचे प्रमाण पाहून स्पीडबेकर दीदींची झोपच उडाली आहे. पुरुलियात भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या अत्याचाराचा पूर्ण न्याय होणार असल्याचे आश्वासन पश्चिम बंगाल भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार, मुलांना देतो. भाजपचे कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामागील आरोपींना शिक्षा होणारच, असे मोदी म्हणाले.