|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तरप्रदेशात रेल्वे दुर्घटना : 30 जण जखमी

उत्तरप्रदेशात रेल्वे दुर्घटना : 30 जण जखमी 

कानपूरनजीक पूर्वा एक्स्प्रेस रूळावरून घसरली : मदतकार्यास वेग, कारणांचा शोध सुरू

वृत्तसंस्था/ कानपूर 

हावडय़ाहून नवी दिल्लीसाठी प्रवास करत असलेल्या पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे शुक्रवारी रात्री उशिरा रुळावरून घसरले असून या दुर्घटनेत 30 जण जखमी झाले आहेत. कानपूर जिल्हय़ातील रुमा गावानजीक ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेमागील कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

दुर्घटनेनंतर कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर प्रवाशांना कानपूर येथे नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कानपूरचे न्यायदंडाधिकारी विजय विश्वास पंत यांनी दिली आहे.

12 पैकी 4 डबे पूर्णपणे उलटले होते. सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ऍक्सिडेंट रिलीफ ट्रेन आणि ऍक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट्स घटनास्थळी पाठविण्यात आली आहेत. दुर्घटनेनंतर संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्या स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले आहे. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व्यवस्थापनाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

नव्या तंत्रज्ञानामुळे….

नव्या तंत्रज्ञानाचा डब्यांमध्ये वापर करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नव्या तंत्रज्ञानयुक्त डब्यांमध्ये टाईट लॉक कप्लर असतात, दुर्घटनेच्या स्थितीत डबे एकमेकांवर एक चढत नाहीत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱयाने दिली. रेल्वेचे डबे एकमेकांवर चढल्यास प्रवाशांना गंभीर जखमा होत असल्याचे पूर्वीच्या दुर्घटनांमध्ये दिसून आले
होते.