|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीयांनो त्रिपोलीतून बाहेर पडा!

भारतीयांनो त्रिपोलीतून बाहेर पडा! 

विदेश मंत्री स्वराज यांचा सल्ला : लीबियामधील हिंसाचारात वाढ

वृत्तसंस्था/ त्रिपोली 

 लीबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये स्थिती वेगाने बिघडत चालली आहे. तेथील हिंसाचाराचा प्रभाव आता भारतीयांवरही पडू लागला आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी त्रिपोलीत अडकून पडलेल्या 500 भारतीयांना त्वरित दुसऱया देशात जाण्याचे आवाहन केले आहे. त्वरित बाहेर न पडल्यास गंभीर संकटात सापडाल, असे स्वराज यांनी म्हटले आहे.

त्रिपोलीतील संघर्षादरम्यान आतापर्यंत किमान 174 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 758 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 14 भारतीयांचा समावेश आहे. 4 एप्रिल रोजी सैन्याधिकारी हफ्तार यांनी त्रिपोलीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने संघर्ष सुरू केल्याने गृहयुद्ध निर्माण झाले आहे.

त्रिपोलीत सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेले गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल अकॉर्डचे सरकार आहे. संयुक्त राष्टसंघाकडून समर्थन प्राप्त सुरक्षा दल आणि हफ्तार यांचे लीबियन राष्ट्रीय सैन्य परस्परांवर नागरिकांना लक्ष्य करण्याचा आरोप करत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात फैयज सेराज आणि विरोधी सैन्यनेते हफ्तार यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर लीबियातील अस्थैर्य कमी होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये देशात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेणे आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्यांवर एकमत झाले होते.  लीबियात यंदा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक घेण्याचे लक्ष्य संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव गुतेरेस यांच्या कार्ययोजनेत सामील आहे.

मध्यपूर्व उत्तर आफ्रिकेचा दौरा करत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांनी याच प्रयत्नांना पाठिंबा मिळावा याकरता लीबियाला भेट देखील दिली आहे. 2011 मध्ये लीबियाचा हुकुमशहा मुअम्मर गद्दाफीच्या पतनानंतर निर्माण झालेले अस्थैर्य, संघर्ष आणि आर्थिक अडचणींवर तोडगा निघू शकतो अशी अपेक्षा गुतेरेस यांनी मार्च महिन्यातच व्यक्त केली होती.