|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » चेन्नईसमोर प्ले-ऑफ निश्चितीचे लक्ष्य

चेन्नईसमोर प्ले-ऑफ निश्चितीचे लक्ष्य 

खराब फॉर्ममधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध आज आयपीएल साखळी सामना, धोनीचे पुनरागमन निश्चित

बेंगळूर / वृत्तसंस्था

चेन्नई सुपरकिंग्सचा संघ मागील लढतीतील पराभवाच्या पाऊलखुणा मागे ठेवत आज आयपीएल मोसमात प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरतील. येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध त्यांचा सामना होईल. लढतीला सायंकाळी 4 वाजता प्रारंभ होणार आहे.

विद्यमान विजेता चेन्नईचा संघ मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून धक्कादायकरित्या पराभूत झाला. अर्थात, धोनी त्या लढतीत पाठदुखीमुळे खेळू शकला नव्हता. ती बाब अर्थातच हैदराबादच्या पथ्यावर पडली. येथे मात्र धोनी संघात परतेल, असे स्पष्ट संकेत आहेत. आरसीबीविरुद्ध पुढील सामन्यात धोनी खेळेल, असे हंगामी कर्णधार सुरेश रैना मागील पराभवानंतर म्हणाला होता.

चेन्नईत या स्पर्धेतील सलामी लढतीत चेन्नई व आरसीबी आमनेसामने भिडल्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीत दोन्ही संघांनी अगदी टोकाचे, विभिन्न यशापयश अनुभवले आहेत. एकीकडे, चेन्नईचा संघ आपल्या लौकिकाला साजेसा खेळण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे तर दुसरीकडे, आरसीबीचा संघ अगदी रसातळाला फेकला गेला आहे. शुक्रवारी सुदैवाने आरसीबीचा संघ केकेआरविरुद्ध जिंकू शकला. पण, 9 सामन्यात त्यांच्यासाठी हा केवळ दुसराच विजय ठरला.

दुसरीकडे, चेन्नईचा संघ येथे आरसीबीविरुद्ध सहज विजय संपादन करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. 8 सामन्यात 2 अर्धशतकांसह 230 धावा झळकावणारा धोनी येथे पुन्हा एकदा निर्णायक योगदान देऊ शकेल. 40 वर्षीय इम्रान ताहीर यंदा चेन्नईसाठी स्टार गोलंदाज ठरला असून 13 बळींसह त्याने कर्णधार धोनीच्या बऱयाच योजना अतिशय परिणामकारकरित्या अंमलात आणल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, एबी डीव्हिलियर्स, कॉलिन डे ग्रँडहोम, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, मोईन अली, शिमरॉन हेतमेयर, डेल स्टीन, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, देवदत्त पडिक्कल, हिम्मत सिंग, मिलिंदर कुमार, गुरकिरत सिंग मान, हेनरिच क्लासेन, पवन नेगी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षदीप नाथ, प्रयास राय बर्मन, कुलवंत खेजरोलिया, टीम साऊदी.

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन (यष्टीरक्षक), स्कॉट कगलेईन.

सामन्याची वेळ : रात्री 8 पासून.

आरसीबी 2016 आयपीएलची पुनरावृत्ती करणार का?

2016 मध्येही आरसीबीची अशीच पीछेहाट झाली होती. त्यावेळी आरसीबीने पहिल्या 7 पैकी 5 सामने गमावले होते. पण, नंतर उर्वरित 7 सामन्यांपैकी चक्क 6 सामने जिंकत ते चक्क प्ले-ऑफसाठी पात्र ठरले. यंदा अद्याप पूर्ण बहरात न आलेल्या डीव्हिलियर्सच्या गैरहजेरीत कर्णधार विराटने धडाकेबाज फलंदाजीची सर्व धुरा आपल्या शिरावर घेत या मोसमातील वैयक्तिक पहिले शतक झळकावले आणि रसेल-नितीश राणाच्या स्फोटक फलंदाजीनंतरही आरसीबी विजय मिळवण्यात सुदैवी ठरले. आता डीव्हिलियर्स संघात परतत असताना आरसीबीचे मनोबल आणखी काही प्रमाणात उंचावलेले असेल. केकेआरने मात्र मागील सामन्यात त्यांचा चांगलाच घाम फोडला होता. 6 षटकात 113 धावांचे आव्हान असताना केकेआर अवघ्या 10 धावांनी विजयापासून दूर राहिले, या आकडेवारीतच ते दिसून येते.