|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » हैदराबादसमोर रसेल-राणाचेच मुख्य आव्हान!

हैदराबादसमोर रसेल-राणाचेच मुख्य आव्हान! 

हैदराबाद / वृत्तसंस्था

घरच्या मैदानावर खेळणारा सनरायजर्स हैदराबादचा संघ आज (दि. 21) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आमनेसामने उभा ठाकेल, त्यावेळी आंद्रे रसेल व नितीश राणा या जोडीचेच त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. सध्या दोन्ही संघांच्या खात्यावर 8 गुण असले तरी हैदराबादने एक सामना कमी खेळलेला आहे. उभय संघातील या लढतीला सायंकाळी 4 वाजता सुरुवात होईल.

हैदराबादने यापूर्वी बलाढय़ चेन्नईला नमवत आपली सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली होती. मागील सलग चार सामन्यात पराभव स्वीकारणाऱया केकेआरसमोर देखील येथे असेच आव्हान असेल. प्ले-ऑफच्या शर्यतीला खऱया अर्थाने रंग भरला असून यामुळे आजच्या लढतीत विजय संपादन करणे किती महत्त्वाचे असेल, याची या दोन्ही संघांना उत्तम कल्पना आहे.

यापूर्वी, शुक्रवारी झालेल्या लढतीत रसेल व राणा यांनी आरसीबीविरुद्ध रोमांचक विजय जवळपास खेचून आणलाच होता. पण, अंतिम क्षणी त्यांच्या पदरी निराशा आली. रॉबिन उत्थप्पाने काही चेंडू वाया घालवले नसते तर त्या लढतीत वेगळेच चित्र दिसूही शकले असते. उत्थप्पाला 20 चेंडूत 9 धावाच जमवता आल्या होत्या. त्या पराभवानंतर दस्तुरखुद्द रसेलने देखील उत्थप्पाऐवजी आपल्याला का फलंदाजीला पाठवले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता.

बेअरस्टो लवकरच मायदेशी

यजमान सनरायजर्स हैदराबादचा संघ बेअरस्टो व वॉर्नर या जोडीवरच पूर्णपणे अवलंबून आहे आणि हीच त्यांची मुख्य चिंता आहे. यापैकी बेअरस्टो लवकरच वर्ल्डकप मोहिमेच्या तयारीसाठी इंग्लंडला रवाना होत आहे. यंदा ही सलामी जोडी बहरली तरच सनरायजर्सचा संघ बहरला आहे, असे एकंदरीत प्रदर्शनावरुन दिसून आले आहे. विश्वचषक संघात समाविष्ट विजय शंकर व कर्णधार केन विल्यम्सन यांच्याकडून अद्याप बडय़ा खेळीची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. 

प्रतिस्पर्धी संघ

केकेआर : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उत्थप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पियुष चावला, कुलदीप यादव, निखील नाईक, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, हॅरी गर्नी, मॅट केली, केसी करिअप्पा, यार्रा पृथ्वीराज.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), बसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनीष पांडे, टी. नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, युसूफ पठाण, बिली स्टेन्लेक, डेव्हिड वॉर्नर, रशीद खान, मोहम्मद नबी, शकीब-उल-हसन, जॉनी बेअरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टील, विजय शंकर, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम.

सामन्याची वेळ : सायं. 4 पासून.