|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » नव्या कर्णधारासह राजस्थानचा ‘रॉयल’ विजय!

नव्या कर्णधारासह राजस्थानचा ‘रॉयल’ विजय! 

अजिंक्य रहाणेला स्पर्धेच्या मध्यातूनच कर्णधारपदावरुन हाकलले, स्टीव्ह स्मिथ नवा कर्णधार

जयपूर / वृत्तसंस्था

स्टीव्ह स्मिथने कर्णधारपदाच्या नव्या अध्यायाला दमदार सुरुवात केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात दिग्गज संघ मुंबई इंडियन्सला 5 गडी राखून सहज पराभूत केले. प्रारंभी मुंबईला 20 षटकात 5 बाद 161 धावांवर रोखल्यानंतर त्यांनी 19.1 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. 48 चेंडूत नाबाद 59 धावा झळकावणारा स्टीव्ह स्मिथ सामनावीर ठरला.

विजयासाठी 162 धावांचा पाठलाग करताना स्मिथची खेळी निर्णायक ठरली. भारताच्या 19 वर्षाखालील विश्वचषक जेत्या संघाचा सदस्य रियान परागने (29 चेंडूत 43) देखील उत्तम फटकेबाजीचा दाखला दिला. स्मिथ व पराग या जोडीने 9.4 षटकात 70 धावांची भागीदारी साकारत संघाला सहजपणे विजयपथावर नेले. कर्णधारपदावरुन डच्चू मिळालेल्या रहाणेला येथे 12 चेंडूत 12 धावांवर समाधान मानावे लागले.

राजस्थानसाठी हा 9 सामन्यातील केवळ तिसरा विजय असून सध्या ते गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकले गेले आहेत. राजस्थान रॉयल्सला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजयाची नितांत आवश्यकता असताना 3.3 षटकात 39 धावांची आतषबाजी करता आली. पण, त्यानंतर रहाणे बाद झाला. संजू सॅमसनने मात्र 19 चेंडूत 35 धावांची आतषबाजी केली.

डी कॉकची फटकेबाजी

प्रारंभी, मुंबई इंडियन्सच्या डावात डी कॉकची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. त्याने 47 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 65 धावांची आतषबाजी केली. शिवाय, दुसऱया गडय़ासाठी सुर्यकुमार यादवसमवेत 68 चेंडूत 97 धावांची दमदार भागीदारीही फलकावर लावली. यादवने 33 चेंडूत 34 धावा केल्या. रहाणेच्या जागी नेतृत्वाची सूत्रे सोपवल्या गेलेल्या स्मिथने तिसऱया षटकात लेगस्पिनर श्रेयस गोपालला पाचारण केले आणि त्यानेही रोहित शर्माचा बळी घेत ती चाल चांगलीच यशस्वी ठरवली.

गोपालला याच षटकातील शेवटच्या चेंडूवर डी कॉकचा बळीही मिळाला असता. पण, लाँगऑनवरील जोफ्रा आर्चरला अवघड झेल टिपता आला नाही. या जीवदानाचा लाभ घेत डी कॉकने 34 चेंडूतच अर्धशतक साजरे केले. हार्दिक पंडय़ाने धुवांधार फलंदाजीची प्रचिती देताना 15 चेंडूत जलद 23 धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : 20 षटकात 5 बाद 161 (क्विन्टॉन डी कॉक 47 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 65, सुर्यकुमार यादव 33 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 34, हार्दिक पंडय़ा 15 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 23, पोलार्ड 7 चेंडूत 10, कटिंग 9 चेंडूत नाबाद 13. अवांतर 9. श्रेयस गोपाल 2-21, स्टुअर्ट बिन्नी, आर्चर, उनादकट प्रत्येकी 1 बळी).

राजस्थान रॉयल्स : 19.1 षटकात 5 बाद 162. (स्टीव्ह स्मिथ 48 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 59, रियान पराग 29 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 43, संजू सॅमसन 19 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 35. अवांतर 6. दीपक चहर 4 षटकात 29 धावात 3 बळी, बुमराह 1-21). 

रहाणेच्या तडकाफडकी उचलबांगडीमुळे खळबळ

या सामन्यापूर्वी 8 लढतीत केवळ 2 विजय मिळवून देणाऱया अजिंक्य रहाणेची राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने तडकाफडकी कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली आणि यामुळे खळबळ उडणे साहजिकच होते. त्याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली गेली. राजस्थानला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित 5 सामन्यांपैकी 4 सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. त्या पार्श्वभूमीवर संघव्यवस्थापनाने नेतृत्वात तडकाफडकी बदल करण्याची चाल खेळली आहे. पण, आश्चर्य म्हणजे स्मिथ फक्त 1 मेपर्यंतच उपलब्ध असून बेन स्टोक्स, जोस बटलर हे या संघातील अन्य स्टार संघ देखील वर्ल्डकपच्या तयारीसाठी आपल्या मायदेशी रवाना होत आहेत.

2018 आयपीएल मोसमापूर्वी स्मिथकडे नेतृत्वाची धुरा होती. पण, चेंडू कुरतडल्याप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवले गेले होते. रहाणेला कर्णधारपदावरुन वगळताना राजस्थान रॉयल्सने त्याचे आभार मानले. रहाणेने कुशल नेतृत्वाच्या बळावर मागील हंगामात संघाला प्ले-ऑफपर्यंत धडक मारुन दिली होती. आम्ही त्याचे आभारी आहोत. या हंगामात आम्ही नेतृत्वात बदल करत आहोत, असे त्यांनी पत्रकातून जाहीर केले. स्मिथने या मोसमात 7 सामन्यात 37.20 च्या सरासरीने 186 तर रहाणेने 25.12 च्या सरासरीने 201 धावांचे योगदान दिले आहे.