|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यघटनेमुळे आजही लोकशाही टिकून

राज्यघटनेमुळे आजही लोकशाही टिकून 

प्रतिनिधी/ फलटण

भारत देशाच्या आजूबाजू असणाऱया राष्ट्रांमध्ये लोकशाही उद्ध्वस्थ होत असताना आपल्या भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे लोकशाही टिकली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून देशातील लोकशाही उद्ध्वस्थ करण्याचे मोदी सरकारने प्रयत्न चालविले असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार असल्याचे सांगत सर्व कामात अयशस्वी झालेल्या सरकारचा मतदारांनी यावेळी पराभव करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे गजानन चौकात आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे, अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे, अनिकेतराजे, विश्वजीतराजे, डॉ. विजयराव बोरावके, सुभाषराव शिंदे, दिलीपसिंह भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, डी. के. पवार, प्रतिभा धुमाळ, रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, मंगेश धुमाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान देशातील शेती, पाणी प्रश्न, दुष्काळ, बेरोजगारी, बंद कारखाने याबाबत दिलासा देणारी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, समाजाशी काडीमात्र संबंध नसलेल्या पंतप्रधानांनी या बाबत न बोलता देशासाठी त्याग केलेल्या गांधी घरण्यावर टीकेची झोड उठवली. जर हे सरकार काही करणार नसेल तर ते बदलावे लागेलं. ज्या गांधी कुटुंबाने स्वातंत्र्य पासून बलिदान केले, त्यांच्यावर सतत टीकात्मक बोलत राहणे एवढेच काम मोदी करत आहेत.

आघाडी सरकारने दुष्काळामध्ये पशुधनाची, शेतकरी व लोकांना वाचविण्यासाठी अनेक छावण्या काढल्या होत्या. आज दुष्काळ पडलाय, शेतकऱयांना कोणीही विचारत नसल्याचे चित्र दिसत आहे. मोदींचे सरकार आल्यानंतर एकही औद्योगिक वसाहत आली नाही,  असेही पवार यांनी सांगितले. 

संजयमामा शिंदे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी ग्रामपंचायत निवडणूक ही लढवली नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यात काहीच दम नाही, असा त्यांनी टोला लगावला. रघुनाथराजे म्हणाले, राजकारणात आल्यापासून दुरुस्ती करावी लागली आहे. असे किती दिवस काम करत रहायचे. आम्ही तिघांनीही अत्यंत कष्ट घेऊन तालुका विकसित करून तालुक्याची घडी बसविली आहे, परंतु कधीही न दिसणारे मात्र निवडणुका आल्या की पुढे येताहेत. याप्रसंगी सतीश माने, रेश्मा भोसले यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.