|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्जाच्या नैराश्येतून दोघा शेतकऱयांची आत्महत्या

कर्जाच्या नैराश्येतून दोघा शेतकऱयांची आत्महत्या 

रामदुर्ग/वार्ताहर

 दोघा कर्जबाजारी शेतकऱयांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी रामदुर्ग तालुक्यात उघडकीस आल्या. तालुक्यातील हुलकुंद येथे इरप्पा रामप्पा तळवार (वय 26) तर निंगप्पा गोपाळेप्पा कानोजी (वय 59) याने  तालुक्यातील सोपडला येथे आत्महत्या केली. कर्जफेडीच्या नैराश्येतून या शेतकऱयांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, इरप्पाने शेती कामासाठी आई-वडील व भावजयीच्या नावे 7 लाख 35 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने संपूर्ण पीक वाया गेले होते. यामुळे मोठय़ा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या नैराश्येतून इरप्पाने गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. इराप्पाचे वडील रामप्पा तळवार यांनी कटकोळ पोलिसात घटनेची फिर्याद दाखल केली आहे.

तसेच निंगप्पा कानोजी याने सोपडला येथील एसबीआय बँकेतून लक्ष्मण व हणमंत या आपल्या मुलांच्या नावे 3 लाख 60 रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जफेड करण्यास विलंब झाल्यानंतर बँक अधिकाऱयांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे निंगप्पाने खासगी बँकेतून कर्ज काढून एसबीआय बँकेचे कर्ज फेडले होते. दरम्यान पावसाने हात दिल्याने शेतातील पीकही वाया गेले. त्यामुळे कर्जफेडीच्या नैराश्येतून निंगप्पाने गुरुवारी दुपारी जनावरांना चारा देण्याच्या बहाण्याने गोठय़ातील तुळईला गळफास घेत आत्महत्या केली. निंगाप्पाची पत्नी यल्लव्वा कानोजी हिने रामदुर्ग पोलिसात घटनेची फिर्याद दाखल केली आहे.