|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दीपिका रेड्डी यांच्या कुचिपुडी नृत्याने भाराववे पुणेकर

दीपिका रेड्डी यांच्या कुचिपुडी नृत्याने भाराववे पुणेकर 

 

 प्रतिनिधी / पुणे :  पारंपारिक नृत्याची पुण्याला मोठी परंपरा असली तरी कुचीपुडी हा नृत्यप्रकार पुणेकरांना क्वचितच बघायला मिळतो. या नेत्रदीपक नृत्यप्रकाराची प्रत्यक्ष अनुभूती खुद्द जागतिक स्तरावरील नृत्यांगना दीपिका रेड्डी यांच्या नृत्याच्या माध्यमातून मिळाल्याने आज पुणेकर प्रेक्षक भारावून गेले. निमित्त होते ‘नृत्ययात्री’ संस्थेच्या संस्थापिका मेघना साबडे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे.

भोसलेनगर, रेंजहिल्स जवळील सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कुचीपुडी नृत्यांगना दीपिका रेड्डी यांनी काही पारंपारिक रचनांवर नृत्यप्रस्तुती केली. ‘विजय गणपती त्वं वंदे…’ या गणेशवंदनेने त्यांनी आपल्या नृत्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘रुद्रमाप्रवेशम’ ही डी. एस. व्ही. शास्त्री यांनी संगीतबद्ध केलेली पारंपारिक कुचीपुडी रचना सादर केली.

दीपिका रेड्डी यांच्या मुली गायत्री आणि श्लोका रेड्डी यांनी श्रुंगार रागातील ‘चक्कनि तलिकी’ ही व्यंकटेश्वर अर्थात बालाजी देवाची पत्नी अलमेलुमंगा यांची स्तुती करणारी नृत्यरचना सादर करीत उपस्थितांची वाह वाह मिळविली. तर ‘नी माटले मायनुरा…’ या पूर्वी कल्याण रागातील जावळीने दीपिका रेड्डी यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कुचीपुडी मधील पारंपारिक तरंगम् ने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

याबरोबरच यावेळी मराठय़ांच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजाविणाऱया रास्ते कुटुंबाविषयीच्या ‘क्रॉनिकल्स ऑफ रास्ते फॅमिली ऑफ मेहूणपुरा’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील पार पडले. रास्ते परिवारातील उमा शशी भालेराव, सुमती दामले, आशा खोत, आनंद भालेराव, प्रदीप खिरे, नितीन भणगे, नागेश भालेराव आणि शांतीलाल कटारिया या मान्यवरांच्या हस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी दिनेश आणि पौर्णिमा रास्ते हे देखील उपस्थित होते