|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » …तर ती ‘काळरात्र’ ठरली असती!

…तर ती ‘काळरात्र’ ठरली असती! 

गुजरातमधील सभेत पंतप्रधान मोदी गरजले : अभिनंदन प्रकरणी पाकला दिला होता इशारा

वृत्तसंस्था/ पाटन

गुजरातमधील पाटन जिल्हय़ात रविवारी झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर शरसंधान केले आहे. या सभेत मोदींनी सर्जिकल स्ट्राइक तसेच हवाईहल्ल्यांचा उल्लेख केला आहे. वायुदलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान यांना सोपवलं नसतं तर, पाकिस्तानसाठी ती ‘कत्ल की रात’ ठरली असती, असं अत्यंत महत्त्वाचं विधान पंतप्रधान मोदींनी केले आहे. मोदींच्या या विधानानंतर सभेच्या स्थळी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या.

पाटन येथील सभेत मोदींनी कामांचा लेखाजोखा मांडला आहे. तसंच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर हल्ला चढविला आहे. ‘भूमिपूत्राची काळजी घेणं हे माझ्या राज्यातील लोकांचं कर्तव्य आहे. गुजरातील सर्व 26 जागा जिंकून द्या, माझं सरकार सत्तेवर येईल, पण माझ्या राज्यातील सर्व जागांवर विजय न मिळाल्यास असं का झालं? यावर 23 मे रोजी वृत्तवाहिन्यांवर चर्चा होईल, अशी टिप्पणी मोदींनी केली आहे.

शरद पवार लक्ष्य

पंतप्रधानपदावर असो किंवा नसो, पण एक तर मी जिवंत राहीन किंवा दहशतवादी जिवंत राहतील, असा निर्धार व्यक्त करत मोदींनी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदी काय करतील हे मला ठाऊक नाही असे पवार सांगतात, मी उद्या काय करणार आहे हे पवारांना माहीत नाही, तर इम्रान खानला कसं माहीत असणार असा सवालही त्यांनी केला.

सुरक्षा दलांना मुक्तहस्त

भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून बॉम्बस्फोट करणारी टोळी जम्मू-काश्मीरपुरती शिल्लक राहिली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले जावे, अशी देशाची इच्छा होती, पण काँग्रेस सरकारने हिंमत दाखविली नाही. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही सैन्याला मुक्तहस्त दिल्याने दहशतवाद्यांना धडा शिकविण्यात आला. “एअरस्ट्राईक झाला आणि खेळ खल्लास’’ असे मोदी म्हणाले.

भारत चौथ्या क्रमांकाची महाशक्ती

अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडले होते, तेव्हा काहीही वावगं घडल्यास सोडणार नसल्याचे पाकिस्तानला बजावले होते. अंतराळात देखील मारा करू शकणारे क्षेपणास्त्र आम्ही तयार केले आहे. भारत सध्या जगात चौथ्या क्रमांकाची शक्ती ठरला आहे. आम्ही एक सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करू इच्छितो असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

जी-20 च्या प्रत्येक बैठकीत सामील

या चहावाल्याने 5 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रकरणी देशाला आघाडीच्या देशांच्या रांगेत नेऊन बसविले आहे. मोदी विदेशात फिरतोय असे विरोधक म्हणतात, पण जी-20 च्या प्रत्येक बैठकीत भारताला स्थान मिळाले. अर्जेंटिनामध्ये जी-20 परिषद आयोजित असतानाच तेथे रशिया, चीन आणि भारत यांची आणखी एक बैठक पार पडली.  याचबरोबर अमेरिका, जपान आणि भारत यांच्यातही महत्त्वाची बैठक झाली. विशेष म्हणजे या सर्व बैठकांमध्ये भारत सामील होता, असे म्हणत मोदींनी देशाच्या वाढत्या सामर्थ्याचा उल्लेख केला आहे.

 

काँग्रेस पक्षामुळेच         राजस्थान तहानलेलं

पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या चित्तोडगडमध्येही रविवारी प्रचारसभा घेतली आहे. राजस्थानातील पाण्याच्या समस्येकरता काँग्रेस जबाबदार आहे. सिंधू जल करारांतर्गत आमच्या वाटय़ाचे पाणी रोखले गेले असते तर आज पाण्याची कमतरता भासलीच नसती.  लोकांची मते घेणारा काँग्रेस पक्ष राजस्थानच्या वाटय़ाचे पाणी पाकिस्तानला देत राहिल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. भाजप सरकारने पाकिस्तानच्या दिशेने वाहणारे पाणी रोखण्यासाठी धरण प्रकल्प सुरू केला असून आगामी काळात राजस्थानला त्याच्या हिस्स्याचे पाणी मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.