|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीलंका पुन्हा ‘रक्तबंबाळ’

श्रीलंका पुन्हा ‘रक्तबंबाळ’ 

आठ स्फोटात 215 जणांचा मृत्यू, 570 हून अधिक जखमी 

कोलंबो / वृत्तसंस्था

श्रीलंकेमध्ये ‘ईस्टर संडे’च्या दिवशीच तीन चर्चसह आठ ठिकाणी स्फोट घडविण्यात आले. या साखळी स्फोटांमध्ये 215 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 570 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीय नागरिकासह 35 हून अधिक विदेशींचा समावेश आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी ‘आयएसआय’वर संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकन तपास यंत्रणांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून सोशल मीडियाच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. हाहाकार माजविणाऱया या स्फोटांनंतर जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील हल्ल्याचा निषेध करणारे ट्विट केले आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरल्यानंतर अवघ्या श्रीलंकेने पुन्हा मृत्यूचे तांडव अनुभवले.  कोलंबोमधील कोचिकाई येथील सेंट ऍन्थोनी चर्च, शांग्री ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल या चार ठिकाणी रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले. तसेच कोलंबोनजिकच्या नेगोम्बो आणि मट्टाकलाप्पू येथील चर्चमध्येही स्फोट घडविण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास सातवा आणि आठवा बॉम्बस्फोट हा काही वेळाच्या अंतरामध्येच झाला. सातवा स्फोट देहिवाला प्राणीसंग्रहालयाजवळ घडविण्यात आला. सातव्या बॉम्बस्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांकडून शोधमोहिम सुरू असताना ओरुगोदवत्ता येथील एका दुमजली इमारतीमध्ये संशयिताने आत्मघाती स्फोट घडविला. त्यामुळे दिवसभरात एकूण आठ ठिकाणी स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. जखमींना कोलंबोतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोशल मीडियावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. बॉम्बस्फोटासंबंधी अफवा पसरू नयेत यासाठी कोलंबोसह बऱयाच भागांमध्ये इंटरनेट व्यवस्थाही बंद करण्यात आली होती.

भीतीमुळे लोक सैरभैर

पोलीस आणि हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या साखळी स्फोटांमध्ये 215 जणांचा मृत्यू झाला आहे तर 550 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोलंबो नॅशनल हॉस्पिटलच्या उपसंचालकांनी 215 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता आहे. जखमींना कोलंबोतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या साखळी स्फोटांमुळे लोक भयभीत झाले असून संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. मुख्यत्वेकरून चर्च आणि आलिशान हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. काही आठवडय़ांपूर्वी न्यूझीलंडमध्ये मशिदीत स्फोट झाले होते. या स्फोटानंतर श्रीलंकेतील हा स्फोट म्हणजे दक्षिण आशियात धार्मिक मूलतत्त्ववाद वाढत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

घटनास्थळी मृतदेहांचे छिन्नविछिन्न तुकडे

संटे ऍन्थोनी चर्चमध्ये ‘ईस्टर’च्या प्रार्थनेसाठी हजारो लोक जमले होते. या प्रार्थनेच्या वेळेसच स्फोट घडवण्यात आल्याने मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. स्फोटाच्या ठिकाणी मृतदेहांचे तुकडे विखुरले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटांनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी दिली.

तातडीने सुरक्षेचा आढावा

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुरक्षेसंबंधीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ आणि वरि÷ अधिकाऱयांसोबत तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि विरोधी पक्ष नेते महिंदा राजपक्षे यांनीही या स्फोटांचा निषेध केला असून हे स्फोट अमानवीय असल्याचे म्हटले आहे.

कट्टरपंथियांवर कारवाईचा इशारा

‘देशातील कट्टरवादी विचारसरणीच्या लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. गेल्या काही दिवसांपासून हे गट ज्या कारवाया करत आहेत, त्यांना आता अजिबात थारा दिला जाणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करू. धार्मिक पातळीवर कट्टरवादी कारवाया करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सध्या लष्कर, पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे श्रीलंकन संरक्षणमंत्री रुवान विजयवर्धने यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

भारताने केला हल्ल्याचा तीव्र निषेध

‘भारत श्रीलंकेत झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहे. या स्फोटात मरण पावलेल्या व्यक्तींचे कुटुंब आणि श्रीलंकेच्या सरकारप्रती आमच्या भावना व्यक्त करत आहोत’, अशा शब्दात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शोकसंदेश जारी केला आहे. भारताने कायमच कट्टरतावादाचा निषेध केला आहे आणि नियंत्रण रेषेपलीकडे होणाऱया कट्टरतावादावर कारवाई करावी, अशी आम्ही कायमच मागणी करतो. अशा भ्याड हल्ल्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱया व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. तसेच या कठीण काळात आम्ही श्रीलंकेचं सरकार आणि तेथील जनतेच्या सोबत आहोत, असेही स्पष्ट केले.