|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » धोनीची झुंज व्यर्थ, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

धोनीची झुंज व्यर्थ, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय 

रोमांचक लढतीत चेन्नई 2 धावांनी पराभूत, धोनीची 48 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी वाया

वृत्तसंस्था/ बेंगळूर

महेंद्रसिंग धोनीच्या (48 चेंडूत नाबाद 84) शानदार खेळीनंतरही आयपीएल साखळी सामन्यात चेन्नईला आरसीबीविरुद्ध अवघ्या दोन धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. प्रारंभी, आरसीबीने 20 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 8 बाद 160 धावापर्यंतच मजल मारता आली. आरसीबीचा हा सलग दुसरा विजय ठरला. अर्थात, गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानीच आहेत.

 आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॅटसन (5), डय़ु प्लेसिस (5), सुरेश रैना (0) व केदार जाधव (9) हे स्टार फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईची 4 बाद 28 अशी बिकट स्थिती झाली होती. पण, धोनीने 48 चेंडूत 5 चौकार व 7 षटकारासह नाबाद 84 धावा करत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. अखेरच्या षटकांत 26 धावांची गरज असताना धोनीने फटकेबाजी करत शेवटच्या एका चेंडूवर दोन धावा असे समीकरण तयार केले होते. अखेरच्या चेंडूवर धाव घेताना शार्दुल धावबाद झाला व हा रोमांचक सामना आरसीबीने अवघ्या 2 धावांनी जिंकला.

 प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट (9) धावांवर बाद झाला. यानंतर, पार्थिव पटेल व एबीडीने दुसऱया 47 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच एबीडीला  25 धावांवर जडेजाने बाद केले. पटेलने 37 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 53 धावा फटकावल्या. स्टोनिस (14) व मोईन अली (26) धावा करत पटेलला चांगली साथ दिली. यामुळे आरसीबीला 20 षटकांत 7 बाद 161 धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 7 बाद 161 (पार्थिव पटेल 37 चेंडूत 53, डिव्हीलीयर्स 25, मोईन अली 26, रविंद्र जडेजा 2/29, ब्रॅव्हो 2/34).

 चेन्नई 20 षटकांत 8 बाद 160 (रायुडू 29, महेंद्रसिंग धोनी 48 चेंडूत 5 चौकार व 7 षटकारासह नाबाद 84, रविंद्र जडेजा 11, डेल स्टीन 2/29, उमेश यादव 2/47, सैनी 1/24).