|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सनरायजर्सचा दणदणीत विजय

सनरायजर्सचा दणदणीत विजय 

केकेआरचा 9 गडय़ांनी धुव्वा, वॉर्नर-बेअरस्टोची अर्धशतकांसह शतकी सलामी, खलीलचे 3 बळी

वृत्तसंस्था/ हैदराबाद

जॉन बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी आणखी एक दमदार सलामी दिल्याने सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमधील साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला.

160 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने 38 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह 67 व बेअरस्टोने केकेआरच्या निष्प्रभ गोलंदाजांची धुलाई करीत 43 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 80 धावा तडकावत 131 धावांची सलामी देत विजय सोपा केला. या दोघांच्या शतकी सलामीमुळे सनरायजर्सने 14 षटकांतच विजयाचे उद्दिष्ट केवळ एका गडय़ाच्या मोबदल्यात सहजपणे पार केले. केकेआरचा हा सलग पाचवा पराभव होता. सनरायजर्सच्या विजयात चौथ्यांदा या जोडीने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध मिळवून देताना अशीच फलंदाजी केली होती.

केकेआराचे क्षेत्ररक्षणही गचाळ झाले आणि त्यांच्या चुकांची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. बेअरस्टोला दोनदा (5 व 58 धावांवर) जीवदान मिळाले. केकेआरच्या पराभवाला त्यांचे फिरकी त्रिकुटही कारणीभूत आहे. सुनील नरेन (4 षटकांत 34 धावा), केसी करिअप्पा (2 षटकांत 34 धावा), पीयूष चावला (3 षटकांत 38 धावा) यांनी 9 षटकांत 106 धावा दिल्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला या सामन्यात वगळण्यात आले होते. पदार्पणवीर पृथ्वीराजने एकमेव बळी मिळविताना वॉर्नरला बाद केले. पण यावेळी सनरायजर्सला 40 चेंडूत केवळ 29 धावांची गरज होती. तो बाद झाल्यानंतर केन विल्यम्सन (9 चेंडूत नाबाद 8) व बेअरस्टो यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या विजयानंतर सनराजयर्सने 9 सामन्यांत 10 गुण घेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. केकेआर मात्र सहाव्या स्थानावरच कायम आहे. त्यांचे 10 सामन्यांत 8 गुण झाले आहेत.

तत्पूर्वी, डावखुरा युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदने प्रभावी मारा करीत 3 बळी मिळविले. त्याने सुनील नरेन (7 चेंडूत 25 धावा), शुभमन गिल (3) व ख्रिस लीन (51) यांना बाद करून केकेआरच्या धावगतीला लगाम घातल्याने त्यांना 8 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. अनुभवी भुवनेश्वरने 35 धावांत 2 तर रशिद खान व संदीप शर्मा यांनी एकेक बळी मिळविले. केकेआरतर्फे लीनने सर्वाधिक धावा जमविल्या. त्याने 47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 51 धावा केल्या. रिंकूने सिंगने 25 चेंडूत 30 धावा फटकावल्या. लीन-सुनील यांनी केकेआरला 42 धावांची सलामी दिली होती. पण त्याचा लाभ इतर फलंदाजांना उठविता आला नाही. सुनीलने आपल्या खेळीत 3 चौकार, 2 षटकार मारले. नितिश राणाने 11, दिनेश कार्तिकने 6 धावा जमविल्या. रिंकू व लीन यांनी पाचव्या गडय़ासाठी 51 धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हुकमाचा एक्का असलेला आंद्रे रसेल 9 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. या अल्पशा खेळीतही त्याने 2 षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक : केकेआर 20 षटकांत 8 बाद 159 : लीन 51 (47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), सुनील नरेन 25 (9 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), रिंकू सिंग 30 (25 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), नितिश राणा 11, रसेल 15 (9 चेंडूत 2 षटकार), भुवनेश्वर 2-35, खलील अहमद 3-33, संदीप शर्मा 1-37, रशिद खान 1-23.

सनरायजर्स हैदराबाद 15 षटकांत 1 बाद 161 : वॉर्नर 67 (38 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), बेअरस्टो नाबाद 80 (43 चेंडूत 7 चौकार, 4 षटकार), विल्यम्सन नाबाद 8, वाय. पृथ्वी राज 1-29.