|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीच्या काँग्रेसनेच काँग्रेसमुक्त केली सांगली -मुख्यमंत्री फडणवीस यांची बोचरी टीका

सांगलीच्या काँग्रेसनेच काँग्रेसमुक्त केली सांगली -मुख्यमंत्री फडणवीस यांची बोचरी टीका 

प्रतिनिधी/ सांगली

कधी काळी बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची सांगली जिल्हयातच दयनीय अवस्था झाली असून, आम्ही काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला पण काँग्रेसला संपविण्यासाठी दुसऱया कुणाचीही गरज भासली नाही. सांगलीच्या काँग्रेसनेच काँग्रेसमुक्त सांगली केली. अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगलीतील जाहीर सभेत बोलताना केली.

सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराच्या सांगताप्रसंगी सांगलीतील स्टेशन चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

ज्या सांगलीकरांनी महापालिकेच्या निवडणूकीत विरोधकांचा सुफडासाफ केला. त्या सांगलीकर जनतेचे मी मनपुर्वक आभार मानतो, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संजयकाका विरोधकांच्या आरोपांने तुम्ही विचलीत होऊ नका, ही ग्रामपंचायतीची नाही तर देशाची निवडणूक आहे. विरोधकांना गल्लीबोळातील निवडणूक खेळत बसू दे, आपण जोरदारपणे पुढे जायचे आहे. जे निवडून येत नाहीत. तेच शिव्याशाप देत बसतात.

सांगलीत काँग्रेसचे तिकीट घ्यायला कोणी तयार नाही. काँग्रेसची अवस्था म्हणजे आमची कुठेही शाखा नाही. अशी झाली आहे. ज्या राजू शेट्टी यांनी आजपर्यंत पवारसाहेबांना शिव्या दिल्या. साखर कारखानदारीच्या चौकशीची मागणी केली. त्यावर आम्ही सीआयडी चौकशी केली. मग पुन्हा घोटाळे केलेल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्हीच बसता. हा तुमचा कुठला स्वाभिमान असा प्रश्न उपस्थित करून फडणवीस म्हणाले, सदाभाऊ खोत हा एकच स्वाभिमान आहे. तोही आमच्याकडे आला आहे. ज्या काँग्रेसवाल्यांनी 50 वर्ष शेतकऱयांना त्रास दिला. त्यांच्यासोबत शेट्टी गेले आहेत. हा प्रकार म्हणजे मेंढयाचे रक्षण करण्याची जबाबदारी कोल्हयावर दिल्यासारखी आहे.

 जाणते राजे केंद्रात मंत्री होते. त्यांनी शेतकऱयांसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारच्या काळात चार वर्षात शेतकऱयांचे एकही आंदोलन झाले नाही. एफआरपी आणि साखरेला भाव दिला. त्यामुळे शेतकरी मोदींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वसंतदादांचे नाव घेणाऱयांचे कर्तृत्व काय, दादांच्या जन्मशताब्दीनिमित्त किती कार्यक्रम घेतले. उलट आम्ही विधीमंडळात आम्ही कार्यक्रम घेतले. 56 पक्षांच्या विरोधकांची महाखिचडी झाली आहे. त्यांच्या भाषणातील अर्धा भाग मोदींना शिव्या देण्यातच जातो. ते रात्री दचकून उठतात. संताजी धनाजी प्रमाणे त्यांना मोदी दिसत आहेत.

गरिबांना 72 हजार देण्याची राहुल गांधी यांची घोषणा म्हणजे कोंबडया विकण्याचा धंदा आहे. अशी टीका करून मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधीचे भाषण म्हणजे मनोरंजन झाले आहे. कदाचित चॅनेलवाले यापुढे हे काल्पनिक असून त्याला चॅनेलवाले जबाबदार राहणार नाहीत, अशी पाटी दाखवतील. अशी खिल्ली उडविली. मोदींनी 34 कोटी जनधन खात्यामध्ये 80 हजार कोटी जमा केले. आता आबू बाबू काही नाही, लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. पाच वर्षात 98 टक्के शौचालये, उज्ज्वल योजनेतून 13 कोटी गॅस, पंतप्रधान आवास योजनेतून दहा लाख घरांची निर्मिती ही आमची कामे आहेत. सांगलीमध्येही तीन वर्षात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. राष्ट्रीय महामार्ग, ड्रायपोर्ट यामुळे येथून शेतीमालाची मोठी निर्यात होणार आहे.

सांगली महापालिकेला 100 कोटी दिले,

सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी दिला. हे पैसे खर्च करा, आणखी मागा सांगलीच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही. ताकारी म्हैसाळ टेंभूसाठी हजारो कोटी दिले, यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून संजयकाकांनी दोन वर्षातच ही कामे पुर्ण केली.

मुंबई बाँम्बस्फोटात किडया मुंग्यासारखे लोक मेले त्यावेळी काँग्रेस सरकारने फक्त पाकिस्तानचा निषेध करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. पण उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून  सर्जिकल स्ट्राईक केला. भारत हा गप्प बसणारा नव्हे तर ठोकणारा देश झाला आहे. त्यामुळे इस्त्रायल आणि अमेरिकेसारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. असेही ते म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, वसंतदादांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. पण दादांचे नाव घेणाऱयांना स्वाभिमानीकडून तिकीट घेण्याची वेळ का आली, त्यांनी हरणारी जागा का घेतली. वंचित आघाडीचा परिणाम किंचित होणार तुम्ही 56 जण काय आणि शंभर जण जरी एकत्रित आला तरी मोदींची बरोबरी करू शकत नाही. राज ठाकरेंच्या इंजिनलाही काही अर्थ नाही. त्यांच्या सभेला माणसे आणली जात आहेत.

संजयकाका पाटील म्हणाले, ही लोकसभेची की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे तेच समजेनासे झाले आहे. जातीपाती आणि खालच्या पातळीवर जाऊन टिका आणि राजकारण केले जात आहे. तुमच्या घरात 11 वेळा खासदारकी होती. त्यावेळी लोकांची सुखदुखे दिसली नाहीत का?

आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वागत केले. सभेस आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संभाजी पवार, रमेश शेंडगे, दिनकर पाटील, नितीन शिंदे, नीता केळकर, शेखर इनामदार, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गणेशराव गाडगीळ, डी. के. पाटील, गजेंद्र कल्लोळी, गौतम पवार, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, केदार खाडिलकर, मुन्ना कुरणे, दिलीप सुर्यवंशी, युवराज बावडेकर, सतिश खंडागळे, विवेक कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.