|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘गुडघे टेकणारे सरकार हवे की आतंकवाद उखडून फेकणारे याचा निर्णय घ्या’

‘गुडघे टेकणारे सरकार हवे की आतंकवाद उखडून फेकणारे याचा निर्णय घ्या’ 

प्रतिनिधी/ विटा

साठ वर्षात काँग्रेसने केवळ जातीयवाद आणि विषमतेचे राजकारण केले, पण जनतेचा विकास केला नाही. आता देश बदलतो आहे. गरीबी, बेरोजगारी हटवून देशाला ज्ञान, तंत्रज्ञानाच्या बळावर विकासात पुढे घेऊन जायचे आहे. गेल्या पाच वर्षात झालेला विकास हा तर केवळ ट्रेलर आहे, असे सांगत देशाला आतंकवादी आणि बाह्यशक्तींच्या समोर गुडघे टेकणारे सरकार हवे आहे की आतंकवाद उखडून फेकणारे मजबूत सरकार हवे आहे? याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदीरच्या पटांगणावर आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, अशोक गायकवाड, तानाजी पाटील, अमोल बाबर, सुहास बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देशातील जनतेने काँग्रेसला 60 वर्षे सत्ता दिली. मात्र यांनी महापुरूषांची नावे घेऊन केवळ मत मागण्याचे काम केले. यांच्या काळात मुब्ंाईत हल्ला झाल्यानंतर यांनी केवळ वल्गना केल्या. मात्र एक आघात होताच आमच्या सरकारने हल्ला करणारांवर एअर स्ट्राईक केला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. या देशाला आतंकवादी आणि बाह्यशक्तींच्या समोर गुडघे टेकणारे सरकार हवे आहे की आतंकवाद उखडून फेकणारे मजबूत सरकार हवे आहे? याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे, असे मंत्री गडकरी म्हणाले.

या देशातील महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. देशात पाण्याचा नाही, तर नियोजनाचा आभाव होता. गेल्या पंधरा वर्षाच्या काळात बरेच सिंचन प्रकल्प ठप्प झाले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱयांच्या आत्महत्त्या रोखायच्या असतील, तर हे प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत, अशी भूमिका घेऊन काम केले. प्रधानमंत्री सिंचाई योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून काम केले आणि आज सिंचन क्षमता 21 टक्क्यांवर पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी 20 हजार कोटींचे प्रकल्प हाती घेतले आहेत. नाबार्ड आणि केंद्राच्या सहाय्याने प्रकल्प मार्गी लागले आहेत. या भागात येताना कॅनॉलमधून वाहणारे टेंभूचे पाणी पाहिले. आमदार अनिल बाबर यांना मी खास विचारले, हे पाणी टेंभूचेच आहे का? समाधान वाटले, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

‘मी थापा मारत नाही’

मी थापा मारणारा नेता नाही. जे केले तेच बोलणार आणि जे करणार तेच तुम्हाला सांगणार. देशात रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत. 17 लाख कोटी रूपयांची कामे झाली आहेत. बुद्ध सर्किट, बद्रीनाथ-केदारनाथ-यमनोत्री-गंगोत्री मार्ग तयार केला आहे. आता बारा महिन्यात कधीही चारधाम यात्रा करू शकाल. महाराष्ट्रात पाच लाख कोटींची रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग, शेगाव ते पंढरपूर महामार्ग हाती घेतले आहेत, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.

‘म्हणूनच प्रियांका गांधींनी जलप्रवास केला’

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटक, तमीळनाडूतील पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. देशात 20 हजार किलोमीटरचे जलमार्ग तयार केले आहेत. अशा 10 जलमार्गावर काम सुरू आहे. आम्ही जलमार्ग तयार केला. त्यामार्गानेच प्रियंका गांधी यांनी प्रवास केला. गंगा शुद्धीकरण केल्यामुळेच त्या गंगेचे पाणी पिल्या, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

‘एकतर्फी आंदोलनाने कारखानदारी धोक्यात’

ब्राझीलमध्ये 20 रूपये किलो साखर आहे. मात्र आपल्याकडे 34 रूपये दर असूनही आम्ही ऊसाला चांगला भाव देतो. भविष्यात साखरेऐवजी इथेनॉल करण्यासाठी प्राधान्य द्यावे लागणार आहे. अन्यथा साखर कारखानदारी खड्डय़ात जाईल, असा धोका मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. साखर कारखान्यांचे प्रश्न समजून घेऊन आंदोलन करण्याचा सल्ला मी खासदार राजू शेट्टी यांना दिला होता. साखर कारखाने टिकले तर शेतकरी टिकतील. एकतर्फी आंदोलनाने कारखानदारी बंद पडण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉलचे अर्थकारण देशात 11 हजार कोटींवरून 2 लाख कोटींवर न्यायचे आहे. त्यासाठी ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल करण्यासाठी आमचे सरकार प्राधान्य देणार आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्याशिवाय सुधारणा होणार नाहीत. तुम्हाला जेवढे पाणी देईल, तेवढा तुम्ही ऊस लावणार, असे सांगत बायो-प्लास्टीक सारखे प्रकल्प आगामी काळात उभा करावे लागतील. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यानंतर पुढच्या पिढीचा शंभर वर्षे फायदा होईल, असे निर्णय घेतले. कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि अर्थिक निकषावरील आरक्षणासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्याचे सांगत मुलभूत निर्णय घेणारे मजबूत सरकार निवडा. काँग्रेसच्या स्व. वसंतदादांच्या नातवाने राजू शेट्टींचे नेतृत्त्व मानून बॅट हाती घेणे दुर्दैवी आहे. गोपिचंदला भाजपने प्रेम दिले तरीही त्यांनी वेगळा पवित्रा घेणे बरोबर नाही, अशी टिका पाटील यांनी केली.

मंत्री सदाभाऊ खोत यांनी देशाला पुढे घेऊन जाणारे सरकार निवडा, असे आवाहन केले तर खासदार संजय पाटील यांनी या निवडणूकीत कामाच्या बळावर उभा असल्याचे सांगत निवडणूकीचा प्रचार दर्जा खालावल्याचे सांगितले. मात्र 23 तारखेनंतर सर्वांचे हिशोब चुकते करणार असल्याचा इशारा देत तुमच्या मदतीसाठी कोण येतं, याचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन केले.

सरकार चांगले असेल तर प्रश्न सुटतात – आमदार बाबर 

आमदार अनिल बाबर म्हणाले, उन्हाळ्यात शंभर टँकरने पाणी पुरवठा कराव्या लागणाऱया माझ्या मतदारसंघात आता 80 टक्के भागात टेंभूचे पाणी फिरले आहे. यासाठी मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. मंत्री आणि सरकार चांगले असेल, तर यक्ष प्रश्न सुटतात, याचे हे उदाहरण आहे. पाणी आल्यानंतर या भागाचा कॅलिफोर्निया होईल, अशी अपेक्षा आमदार बाबर यांनी व्यक्त केली.

स्वागत आणि प्रास्ताविक अशोक गायकवाड यांनी केले, तर आभार सभापती मनिषा बागल यांनी मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, राजाराम गरूड यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र भिंगारदेवे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, विनोद गुळवणी, शंकर मोहिते, हणमंत पाटील, वैभव म्हेत्रे, सुरेश यादव, विजय पाटील, डॉ. आबासाहेब साळुंखे, संजय भिंगारदेवे, जगन्नाथ पाटील, विनोद गोसावी, अनिल म. बाबर, दिलीप आमणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.