|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गल्लीसाठी नाहीतर दिल्लीसाठी नेता निवडायचाय

गल्लीसाठी नाहीतर दिल्लीसाठी नेता निवडायचाय 

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ ओगलेवाडी

 लोकसभेत काम करणाऱया नेत्याला लोकशाहीची जाण असावी आणि जनतेचे  प्रश्न तळमळीने लोकसभेत मांडणारा नेता असावा. त्यामुळे या निवडणुकीत गल्लीसाठी नाही तर दिल्लीसाठी नेता निवडायचा आहे. याचे भान ठेऊन मतदान करावे, असे प्रतिपादन राज्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

 ओगलेवाडी येथे सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, सहकार परीषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, कराड नगरपरीषदेचे नगराध्यक्ष रोहिणी शिंदे व भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 मंत्री पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशातील सामान्य नागरिक सुखी, आनंदी आणि सुरक्षित आहे. वेगवेगळ्या लोक कल्याणकारी  योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यत लाभ पोहचवून त्यांना आर्थिक सुरक्षा देण्याचे काम शासनाने केले. येणाऱया काळात आयुष्यमान योजनेतून पाच लाख रुपयांचे कार्ड आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱया लोकांना देण्याचा मानस आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित पाच लाखापर्यंत सर्व सविधा मोफत देण्यात येतील. याशिवाय अनेक वर्षे मराठा समाजाची असणारी आरक्षणाची मागणी पूर्ण करून सोळा टक्के कोर्टात टिकणारे आरक्षण या सरकारने दिले. धनगर समाजाच्या बाबतीत आरक्षण देण्यासाठी अहवाल सादर केला असून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आदिवासी लोकांना मिळणारे सर्व लाभ तोपर्यंत धनगर समाजाला देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

 युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी येत्या पाच वर्षांत सातारचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे सांगितले. शेखर चरेगावकर यांनी कार्यकर्त्यांनी मतदारांना भेटून विकासकामे आणि मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर डॉ. अतुल भोसले यांनी विविध योजनांची माहिती देत संरक्षाणाची कणखर भूमीका मोदींनी घेतली असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी साताऱयातून नरेंद्र पाटील यांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य  सागर शिवदास, दादा डुबल, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी आपले विचार मांडले.

 यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशिल मोझर यांनी नाळेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयांसह अनेक गावच्या मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाजपमध्ये स्वागत केले. 

 प्रास्ताविक रामकृष्ण वेताळ यांनी तर आभार चंद्रकांत मदने यांनी मानले. या कार्यक्रमाचे अतिशय कमी कालावधीत नेटके नियोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी रामकृष्ण वेताळ, मोहन जाधव, यांचे कौतुक केले. ओगलेवाडीसह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.