|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कैकाडी समाजाचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कैकाडी समाजाचा पाठिंबा 

प्रतिनिधी/ सातारा

राज्यातील कैकाडी समाजाचा लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्याशी संलग्न असलेल्या पक्षास पाठिंबा व समर्थन देत असल्याचे निवेदन कैकाडी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले. यावेळी अरूण माने, लालासाहेब जाधव, हनुमंत माने, रघुनाथ जाधव, स्वरूपचंद गायकवाड, जयशंकर माने, दीपकराव शामदिरे, सोमनाथराव जाधव, रघुनाथ जाधव, बंडूपंत जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रिय बंधन उठवून इतर राज्यातील कैकाडी समाजास विदर्भाप्रमाणे अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, म्हणून 8 जुलै 2014 रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्यातील कैकाडी समाजातील संघटना व प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक आयोजित करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महासंचालक, बार्टी पुणे यांनी 5 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केला होता.

मंत्र्यांनी समाजास साथ दिली

त्यावेळी राज्यामध्ये काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांनी राज्यातील कैकाडी समाजास न्याय मिळविण्यासाठी पुढाकार घेऊन 9 सप्टेंबर 2014 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करून त्या प्रस्तावास कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी केंद्र शासन, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आला होता. या कामासाठी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी समाजास साथ दिली आहे, त्यामुळेच आम्ही पाठिंबा देत असल्याचे नमूद केले आहे.