|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निष्क्रिय असतो तर चार वेळा निवडून आलो नसतो

निष्क्रिय असतो तर चार वेळा निवडून आलो नसतो 

श्रीपाद नाईक यांचे टीकाकार, विरोधकांना प्रत्युत्तर

प्रतिनिधी/ पणजी

भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची असून लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकट केली. तसेच यावेळी मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा जास्त मिळेल, असे भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. निष्क्रिय खासदार असल्याचा विरोधकांचा अपप्रचार व आरोप नाईक यांनी फेटाळून लावला आणि विकासकामे केल्यामुळेच चारवेळा निवडून आल्याचा दावा त्यांनी केला.

पणजीत भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की भाजपसारखा पद्धतशीर प्रचार कोणीच केला नाही. भाजपने प्रचाराच्या तीन फेऱया संपवल्या असून उत्तर गोवा मतदारसंघातील सर्व 20 विधानसभा मतदारसंघात व सर्व पंचायतक्षेत्रात प्रचार केला आहे. म्हापसा व शिरोडा आणि मांद्रेतही भाजपने सर्व पंचायत क्षेत्रात प्रचारास जोर लावला. सर्वत्र भरघोस प्रतिसाद लाभल्यामुळे निवडणूक होत असलेल्या सर्व मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होणार आहे, अशी खात्री डॉ. सावंत यांनी वर्तविली.

केंद्रात आणि गोव्यात स्थीर सरकारसाठी भाजपचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. यावेळी देशासाठी मत आवश्यक आहे. नवनिर्माण भारतासाठी भाजप उमेदवार विजयी झाले पाहिजेत. सुज्ञ गोवेकरांना अधिक काही सांगण्याची गरज नाही. भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहता मतदार यावेळी भाजपला निवडून देतील, अशी खात्री डॉ. सावंत यांनी दिली.

नाईक म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत आपले मताधिक्य पूर्वीपेक्षा जास्त वाढणार असून प्रत्येक 5 वर्षाचा अहवाल आपण जनतेपुढे ठेवला आहे. शिवाय केलेल्या कामांची यादी मतदारांना सादर केली आहे. एकूण 100 खासदारांमध्ये आपल्या कामकाजानुसार 11 वा क्रमांक लागतो असे एका एनजीओ सर्वेक्षणातून आढळले आहे. त्यामुळे विरोधकांचा आरोप चुकीचा असून त्यांच्याकडे कोणतेच विषय नसल्यामुळे ते अपप्रचार करीत आहेत, परंतु जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे. आपणास पुन्हा एकदा विजयी करतील, अशी खात्री नाईक यांनी दिली.

श्रीलंका आतंकवादी हल्ल्याचा निषेध

श्रीलंकेतील चर्च, हॉटेल्सवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणी गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाशी चर्चा केली असून राज्यातील चर्च व इतर ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस खात्याला दक्षतेचे आदेशही देण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.