|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात

प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात 

 उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील दोन लोकसभा व तीन विधानसभा पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आला असून आता लक्ष उद्या मंगळवार 23 एप्रिल रोजी होणाऱया प्रत्यक्ष मतदानाकडे लागून राहिले आहे. भाजपने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून त्या जिंकण्यासाठी जोर लावला आहे. राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षातच खरी लढत असून दोन्ही पक्षांचे गोव्यातील भवितव्य निवडणुकीवर अवलंबून आहे.

गेले जवळजवळ दोन आठवडे हा प्रचाराचा धुमधडाका सुरू होता. लहान मोठय़ा सभा आणि घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांना भेटणे यावरच प्रामुख्याने सर्व पक्षीय उमेदवारांनी प्रचारासाठी भर दिला. कडक उन्हातूनही उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकत्यांनी दिवसरात्र फिरून प्रचार केला. आता उद्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज सोमवार 22 एप्रिल रोजी मतदानयंत्रासह सर्व साधनसामुग्री घेऊन नेमण्यात आलेले कर्मचारी अधिकारी सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.

मतदान केंद्राबाहेर मंडप

प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले असून मतदार यादीत नाव असलेल्या व तसे ओळखपक्ष असलेल्या मतदारांनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. मतदारांसाठी मतदान केंदावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून दिव्यांगासाठी देखील खास सोय केली आहे. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बहुतेक सर्व मतदान केंद्राबाहेर मंडप घालण्यात आले आहेत.

निवडणूक यंत्रणा सज्ज

आगामी लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोवा लोकसभेसाठी एकूण 11 लाख 35 हजार 811 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 55 हजार 768 पुरुष तर 5 लाख 80 हजार 043 हे महिला मतदार आहेत. राज्यात सुमारे 1127 ठिकाणी एकूण 1652 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे 9275 सरकारी कामगार कार्यरत आहे. तसेच 3231 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात असून यातील जवळपास 1000 पोलीस हे केंद्रीय राखीव दलाच्या 12 तुकडय़ांमधील आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

आल्तिनो येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व अबकारी आयुक्त अमित सतेजा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

11.64 कोटी रुपयांचा माल जप्त

 गेल्या काही महीन्यात बेकायदेशीर डॅग्ज, मद्य, बेहिशोबी रक्कम मिळून सुमारे 11.64 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. परंतु अबकारी खात्याच्या अधिकारी, पोलीस, तसेच खास तैनात केलेले फ्लाइंग स्क्कॉड यांच्यातर्फे कारवाई करत जप्त करण्यात आले आहे. तसेच 4324 शस्त्रे पोलीस स्थानकांमध्ये जमा करण्यात आली आहे, असे अबकारी आयुक्त अमित सतेजा यांनी सांगितले.

26 अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रे

यादरम्यान एकूण 26 अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर 9 खर्चिक संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तसेच आतापर्यंत आचरसंहिता भंगच्या 54 तक्रारी नोंद झाल्या असून यातील 36 तक्रारी निकालात काढण्यात आली आहे. तर 18 तक्रारींवर कारवाई सुरु आहे, असे कुणाल यांनी पुढे सांगितले.

 मांद्रे, म्हापसा, शिरोडा या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी एकूण 133 मतदान केंद्रे आहेत. यावेळी मांद्रे मतदारसंघात एकूण 32 हजार 153 मतदार आहेत. यामधील 15 हजार 993 पुरुष तर 16 हजार 160 महिला मतदार आहेत. म्हापसा मतदारसंघात 29 हजार 212 मतदार आहेत. यामध्ये 14 हजार 367 पुरुष व 14 हजार 845 महिला मतदार आहेत. तर शिरोडा मतदारसंघात 28 हजार 962 मतदार असून यामध्ये 14 हजार 065 पुरुष तर 14 हजार 897 महिला मतदार आहेत. 

पोलीस बंदोबस्तात वाढ

श्रीलंकेत झालेल्या बाँम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील चर्चेस, मंदिरे, हॉटेल्स, व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच पोलिसांना व केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे, असे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले.