|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोव्यात भाजपचा विजय नक्की

दक्षिण गोव्यात भाजपचा विजय नक्की 

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप तर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आला व त्याला मतदारांचा प्रतिसाद मिळाला ते पाहता दक्षिण गोव्यात पुन्हा एकदा भाजपचा विजय नक्की असल्याची माहिती भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पंधरा दिवसांच्या प्रचारात 350 पेक्षा जास्त बैठका भाजपने घेतल्या. त्यात कोपरा बैठका व जाहीर सभाचा समावेश होता. या बैठकांच्या माध्यमांतून केंद्रात नरेंद्र मोदीच्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारची का जरूरी आहे हे मतदारांना पटवून देण्यात आले. विकास म्हणजे काय व तो कशा पद्धतीने होऊ शकतो, हे गेल्या पाच वर्षाच्या राजवटीत अनुभवण्यास मिळाला आहे. साधन सुविधा, दक्षिण गोव्यात पासपोर्ट कार्यालय, खलाशांच्या समस्या, शॅक मालकांचा प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आल्याची माहिती खा. नरेंद्र सावईकर यांनी दिली.

जाती-धर्माच्या नावाने मतदारांमध्ये फुट पाडण्याचे प्रकार भाजपने गेलेले नाहीत. केवळ विकासाच्या मुद्दावरच आम्ही पुढे जात असून, आगामी काळात राजकारणात जाती-धर्माचे राजकारण करता येणार नाही. केवळ विकासाच्या मुद्दावरच राजकारण चालणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने खऱया अर्थाने गोव्याचा विकास केला आहे. केंद्रातून मोठय़ा प्रमाणात निधी आणून विकासाला चालना दिली. गोव्यातील खनिज व्यवसाय बंद असताना देखील येथील विकासकामे चालू राहिली ती केवळ केंद्र सरकारने भरीव मदत दिल्यामुळे. या विकासकामांच्या बळावरच मतदार पुन्हा एखदा भाजपला संधी देतील असा दावा यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

केंद्रात व गोव्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास, केंद्रातून निधी मिळविण्यास उपयुक्त ठरते. केंद्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याने, मतदारांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांनाच निवडून द्यावे. ते गोवा व केंद्र सरकारच्या दरम्यान महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील मंत्र्यांचे गोव्यावर प्रेम आहे म्हणूनच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यासाठी 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. जर गोव्यावर प्रेम नसते तर लहानश्या गोव्यात दोन मंत्रीपदे मिळालीच नसती. या मंत्रीपदामुळेच गोव्याला केंद्रात मानाचे स्थान मिळाले असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

भाजपकडून अल्पसंख्याकांवर हल्ले केले जातात, त्यांना त्रास दिले जातात असा खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. त्याला कुणी बळी पडू नये असे आवाहन श्री. गुदिन्हो यांनी यावेळी केले.