|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तिसऱया टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

तिसऱया टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज 

16 राज्यात 117 जागांसाठी उद्या मतदान : प्रचारतोफा थंडावल्या, दिग्गजांचे भवितव्य पणाला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात 16 राज्यातील 117 जागा आणि ओडिशा विधानसभेच्या 42 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रचाराचा वाढत चाललेला जोर या धामधुमीत गेले काही दिवस राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चढाओढ पहायला मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान देशात ठिकठिकाणी रॅली, रोड शो, जाहीर सभांच्या माध्यमातून पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, विविध पक्षांच्या उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर देत जोरदारपणे प्रचारमोहीम राबविली. 17 व्या लोकसभेसाठी मतदानाचा हा सर्वात मोठा टप्पा आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता तिसऱया टप्प्यासाठीचा जाहीर प्रचार थांबला असून, मंगळवारी होणाऱया मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

16 राज्यातील 117 लोकसभा मतदारसंघांसाठी विविध राज्यात प्रशासनाकडून मोठी यंत्रणा उभारली आहे. ओडिशा विधानसभा मतदारसंघातील 147 पैकी 42 जागांसाठी तिसऱया टप्प्यात लोकसभेबरोबरच मतदान होणार आहे. तिसऱया टप्प्यानंतर दक्षिण भारतातील लोकसभेची मतदानप्रक्रिया पूर्ण होणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यात लोकसभेच्या 117 जागांवर 1,630 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये देशातील अनेक राजकीय नेते आपले भविष्य आजमावत आहेत. केरळमध्ये वायनाड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत असून, समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. उत्तरप्रदेशमधील 10 जागांवर लोकसभेसाठी मतदान होत असून, समाजवादी पक्ष 9 जागांवर तर बहुजन समाज पक्ष एका जागेवर रिंगणात आहे. 

स्टार प्रचारकांचा जोरदार प्रचार

लोकसभेच्या तिसऱया टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, बसप प्रमुख मायावती, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य स्टार प्रचारकांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. बिहारमध्ये जनता दलाचे नेते नितीश कुमार, लोक जनशक्ति पक्षाचे नेते रामविलास पासवान, उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रचारमोहिमेत भाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला.

 दुसऱया टप्प्यातील दोन जागांसाठीही मतदान

तिसऱया टप्प्यात पहिल्यांदा 14 राज्यातील 115 लोकसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार होते. या जागांशिवाय दुसऱया टप्प्यात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती, त्या जागांवर तिसऱया टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. या मतदारसंघांसह 16 राज्यातील 117 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 23 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया मतदान केंद्रात सुरू होणार आहे.

 

16 राज्यातील 117 जागांसाठी आज मतदान…

गुजरात (सर्व)   26

केरळ (सर्व)      20

महाराष्ट्र                      14

कर्नाटक                       14

उत्तर प्रदेश       10

छत्तीसगड        7

ओडिशा                       6

पश्चिम बंगाल   5

बिहार             5

आसाम                        4

गोवा              2

जम्मू काश्मीर   1

दीव दमण        1

दादरा नगर हवेली         1