|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रामकृष्ण खांदारे मी अनंत आहे

रामकृष्ण खांदारे मी अनंत आहे 

मुचकुंद भगवंताला पुढे म्हणाला-

हे महाभागा ! सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात. आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे. मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. राजा मुचुकुंद असे म्हणाला, तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवनदाते भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले- मुचुकुंदा ! माझे जन्म, कर्मे आणि नामे हजारो आहेत. ती अनंत असल्याने मीही त्यांची गणती करू शकत नाही. एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल, परंतु माझे जन्म, गुण, कर्मे आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही. हे राजा! श्रे÷ ऋषीसुद्धा माझ्या तिन्ही कालांतील जन्म आणि कर्मांचे वर्णन करीत असतात, परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही. असे असूनही राजा! मी आपला वर्तमान जन्म, कर्मे आणि नामे तुला सांगतो, ऐक! धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती. त्यानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केला आहे. मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात. आतापर्यंत मी कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालनेमी, प्रलंब इत्यादी साधुद्रोही असुरांचा संहार केला आहे. राजन! हा कालयवन तुझी तीक्ष्ण दृष्टी पडताच भस्म झाला. तोच मी, तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो आहे. तू भक्तवत्सल अशा माझी यापूर्वी फार आराधना केली आहेस. म्हणून हे राजर्षे! वर माग. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. जो पुरुष मला शरण येतो, त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही. महामुनी श्रीशुकदेव म्हणतात- भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले, तेव्हा गर्गांच्या वाणीचे राजा मुचुकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत, हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंताच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली. मुचुकुंद म्हणाला-हे प्रभो! जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहीत होऊन राहिले आहेत. ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो, हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत.

 मुचकुंदाचीच भावना तुकाराम महाराज एका अभंगात व्यक्त करतात, तो अभंग असा –

सांगतों तुम्हांसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां । करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरिं वाहावसी । कांहीं न लगे एक भाव चि कारण। तुका म्हणे आण विठ्ठलाची ।

अभंगाचा भावार्थ असा – अरे, मी तुम्हाला सांगतो कीं, तुम्ही विठ्ठल देवास भजा. जर तसे न कराल तर तुमचा जन्म व्यर्थ गेला असें समजा. अन्य कांही सायास कराल, तर तुम्ही या संसारनदीच्या, मायेच्या पुरानें वाहावलें जाऊन श्रीहरीच्या पदापासून अतिशय दूर व्हाल. तुकाराम महाराज म्हणतात-देवाच्या ठिकाणी एका भावावांचून दुसऱया कोणत्याही गोष्टीची जरूरी नाहीं, हें मी श्रीविठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो.

Ad. देवदत्त परुळेकर