|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » निमित्त निवडणुकींचे आणि वृत्तपत्रांना ‘अच्छे दिन’!

निमित्त निवडणुकींचे आणि वृत्तपत्रांना ‘अच्छे दिन’! 

निवडणुकीच्या निमित्ताने विविध प्रकारे व विविध जणांचे भाग्य फळते व त्यामध्ये प्रसारमाध्यमे हा ही एक महत्त्वाचा घटक असतो. यंदा हे भाग्य ओडिशातील एरवी कमी लक्ष दिल्या जाणाऱया वृत्तपत्रांच्या नशिबी आले आहे. अर्थात यंदा ओडिशाच्या संदर्भातील वृत्तपत्रांना ‘अच्छे दिन’ येण्याचे एकमेव व दुहेरी कारण म्हणजे राज्यात यंदा एकाचवेळी होणाऱया लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका!

गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास क्वचितच एखादा दिवस गेला असेल की ज्यादिवशी राज्यातील वृत्तपत्रांना राज्य सरकारची संपूर्णपानी जाहिरात मिळालेली नाही. या जाहिरातींमध्ये नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल सरकारच्या विविध योजना, घोषणा, भूमीपूजन, उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचा समावेश करण्यात येऊन या जाहिरातींच्या मजकुराच्या सर्वात वर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा ठळक व हसरा चेहरा आवर्जून प्रकाशित केला जात असे. जून 2018 पासून राज्यसरकारने आपल्या जाहिरातींवर 92.44 कोटींचा भरगच्च खर्च केला आहे व त्यामध्ये प्रथमच राज्यातील वृत्तपत्रांचा सर्वाधिक मोठा म्हणजेच 82.51 कोटींच्या जाहिरातींचा भरगच्च वाटा आहे. याआधीच्या म्हणजेच 2016-17 या निवडणूकापूर्व आर्थिक वर्षात राज्य सरकारने आपल्या व माहिती व जनसंपर्क विभागातर्फे दिल्या गेलेल्या वर्षभरातील विविध जाहिरातींवर खर्च केलेल्या 40.47 कोटीच्या वार्षिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहामाहीत त्याहून दुप्पट खर्च करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा मथितार्थ सहजपणे कुणाच्याही लक्षात येईल.

ओडिशा सरकारतर्फे आपल्या यावेळच्या जाहिरातबाजीच्या धोरणामध्ये सरकारसमर्थक व विरोधी भूमिका घेणारी वृत्तपणे व प्रसारमाध्यमांच्या संदर्भात प्रामुख्याने अंमलात आणण्याचे पण स्पष्ट झाले आहे. या संदर्भात प्रामुख्याने देण्यासारखे उदाहरण म्हणजे ओडिशातील सर्वाधिक खपाचे दैनिक असणाऱया ‘संवाद’ चे मालक-संचालक सौम्यरंजन पटनायक यांनी गेल्या मार्चमध्ये बीजदमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना राज्यसभेत तर पाठविण्यात आलेच शिवाय त्यांच्या दैनिकाला राज्य सरकारने दिलेल्या जाहिरातींची रक्कम होती सुमारे 10 कोटी.

याउलट स्थिती जय पांडा यांच्या ‘ओडिशा टेलिव्हिजन’ या राज्यातील क्र. 1 च्या टीव्ही चॅनलला मात्र राज्य सरकारची एकही जाहिरात मिळाली नाही. याउलट राज्यातील ‘कलिंग टीव्ही’ व ‘न्यूज वर्ल्ड ओडिशा’ या टीव्ही चॅनल्सना मात्र 2017-18 या वर्षात मिळून 1.03 कोटींच्या जाहिराती मिळाल्या.