|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » साध्वींना बनावट प्रकरणात गोवलं : शाह

साध्वींना बनावट प्रकरणात गोवलं : शाह 

हिंदू दहशतवादाच्या नावावर काँग्रेसचे कारस्थान : ममता बॅनर्जींकडून जनतेचा अपेक्षाभंग

वृत्तसंस्था/ कोलकाता

 भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांचा बचाव केला आहे. साध्वी यांना खोटय़ा प्रकरणात अडकविण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक आता कुठे आहेत असा प्रश्न शाह यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

हिंदू दहशतवादाच्या नावावर एक बनावट प्रकरण उभं करण्यात आलं, जगभरात भारताच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. न्यायालयात खटला चालल्यावर प्रकरण बनावट आढळून आले आहे. स्वामी असीमानंद आणि उर्वरितांना आरोपी ठरवत बनावट प्रकरण उभं करण्यात आले मग समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत? पूर्वी पकडण्यात आलेल्या लोकांना का सोडण्यात आले, असे प्रश्न भाजप अध्यक्षांनी उपस्थित केले आहेत.

भाजपला संधी द्या

पश्चिम बंगालच्या जनतेने दीर्घकाळापर्यंत डाव्यांना संधी दिली आणि त्यानंतर ममतादीदींवर विश्वास दाखविला. पण या सर्वांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. एकदा भाजपला संधी देऊन बघा, आम्ही राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेऊ. पश्चिम बंगालला नव्या उंचीवर पोहोचवू असे शाह यांनी जनतेला आवाहन केले आहे.

ममता दीदींची हुकुमशाही

ममता बॅनर्जी भाजप नेत्यांच्या सभा रोखत आहेत. आमच्या नेत्यांची हेलिकॉप्टर्स उतरू दिली जात नाहीत. पण या सर्वांची फळे त्यांना भोगावी लागत आहेत. जनताच त्यांच्या सभांवर बहिष्कार टाकत आहे. मागील दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींना बंगालमध्ये स्वतःचा पराभव दिसून आला आहे. याच कारणामुळे त्या बिथरल्याचे शाह म्हणाले.

देशभरात एनआरसी

एनआरसी देशभरात लागू करण्याचा निर्णय भाजप घेणार आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाच्या माध्यमातून धार्मिक कारणांमुळे दुसऱया देशांतून आमच्या देशात आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्याचा मुद्दा आमच्या संकल्पपत्रात नमूद आहे. हिंसाचाराची एक मर्यादा असते. पण जनतेने परिवर्तनाचा निर्धार केल्यावर तो रोखणे कुणालाच शक्य नसते. पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला यंदा हटविण्याचा आणि भाजपला सत्तेवर आणण्याचा निश्चय केल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

साध्वींसोबत अन्याय

साध्वी प्रज्ञा या भारताच्या कन्या असून त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन एका ध्येयासाठी समर्पित केले आहे. कोणत्याही गुन्हय़ाशिवाय कायद्याचा गैरवापर करत साध्वींना तुरुंगात डांबण्यात आले होते. काँग्रेसने भगवा तसेच हिंदू दहशतवाद यासारखे शब्द वापरून हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारीचा ‘मुहूर्त’ साधला

भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा यांनी सोमवारी स्वतःचा अर्ज भरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या साध्वींनी मंत्रोच्चारात अर्ज दाखल केला आहे. साध्वी प्रज्ञा मंगळवारी पुन्हा पक्षनेत्यांसह रोड शो करत जिल्हाधिकारी कार्यालयात फॉर्म-बी जमा करणार आहेत. या अर्जावर पक्षाबद्दल माहिती नमूद असते. अर्ज भरताना साध्वी यांच्यासोबत माजी मंत्री उमाशंकर गुप्ता तसेच खासदार आलोक संजर उपस्थित होते. काँग्रेसने या मतदारसंघात दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दिग्विजय यांनी शनिवारी स्वतःचा अर्ज भरला आहे.