|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा

श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा 

साखळी स्फोटातील मृतांचा आकडा 300 वर

कोलंबो / वृत्तसंस्था

श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण हल्ल्यातील मृतांचा आकडा 300 वर पोहोचला आहे. साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सोमवारी मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी केली. एकीकडे ही घोषणा केली जात असतानाच श्रीलंकेतील पोलिसांनी कोलंबो येथील बसस्थानक परिसरातून तब्बल 87 डिटोनेटर्स जप्त केले आहेत. तसेच सोमवारी आणखी एका ठिकाणी आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला पेटवून घेत स्फोट घडवला. मात्र, यात मोठी जीवितहानी झाली नाही. साखळी स्फोटप्रकरणी आतापर्यंत 24 संशयित व्यक्तींना श्रीलंकन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोलंबो शहर रविवारी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले होते. कोलंबो, नेगोम्बो आणि बाट्टिकालोआ येथील चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी साखळी स्फोट झाले होते. ख्रिश्चन धर्मासाठी महत्त्वाच्या असलेल्या ईस्टर संडेच्या दिवशीच हे स्फोट झाले होते. या हल्ल्यात जवळपास 500 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जण अजूनही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय अधिकारी बोलून दाखवत आहेत. दरम्यान, साखळी स्फोट कुणी घडवून आणले याबाबत काहीही ठोस माहिती हाती प्राप्त झाली नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तरीही आयएस या दहशतवादी संघटनेच्या सहभागाबाबत सर्व आडाखे सुरक्षा यंत्रणांकडून तपासले जात आहेत. लंकन गुप्तचर विभागाकडून हल्लेखोर संघटनेची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन ठिकाणी स्फोटकांचा साठा जप्त

पेट्टाह येथील बॅस्टियन मवाथा येथील बस स्थानकातून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात डिटोनेटर्स जप्त केले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. रविवारी रात्री उशिरा कोलंबो विमानतळाजवळ काही स्फोटके निकामी करण्यात आली. विमानतळाजवळच एका पीव्हीसी पाईपमध्ये ही स्फोटके ठेवल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

सावधगिरीसाठी आणीबाणी लागू : राष्ट्राध्यक्ष

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी सोमवारी दुपारी देशात आणीबाणीची घोषणा केली. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणीबाणी लागू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात कारवाईसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, असे श्रीलंकेतील सरकारने स्पष्ट केले आहे.

‘आयएस’वर संशयाची सुई

श्रीलंकेत पूर्वी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या कारवायांमुळे दहशतवाद फोफावला होता. तो 2009 मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे यात तमिळ गटांचा हात असण्याची शक्मयता नाही. हल्ल्याचे स्वरूप बघता हे आयएस किंवा त्यांच्या एखाद्या गटाचे कृत्य असावे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. आतापर्यंत 24 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असले तरी या हल्ल्यामागे कुणाचा हात होता हे अद्याप समजलेले नाही.

डेन्मार्कमधील धनाढय़ाने गमावली तीन मुले

डेन्मार्कमधील धनाढय़ अशी ओळख असलेल्या अँडर्स हॉक पॉल्सन यांनी आपल्या चार मुलांपैकी तीन मुलांना श्रीलंकेतील साखळी स्फोटात गमावली आहेत. पॉल्सन कुटुंबीय सुट्टी व्यतीत करण्यासाठी पर्यटनाच्या निमित्ताने श्रीलंकेत आली असताना ही दुर्घटना घडली आहे. तीन मुलांच्या मृत्यूनंतर पॉल्सन दाम्पत्य दुःखाच्या छायेत लोटले आहे. पॉल्सन यांचा ‘फॅशन फर्म’चा व्यवसाय असून स्कॉटलंडमध्ये त्यांच्या नावावर मोठय़ा प्रमाणात जमीन असल्याचेही समजते.