|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » इराणी तेलामुळे शेअरबाजाराची घसरगुंडी

इराणी तेलामुळे शेअरबाजाराची घसरगुंडी 

सेन्सेक्स 495 अंकांनी तर निफ्टी 158 अंकांनी खाली

वृत्तसंस्था / मुंबई

इराणकडून होणारी तेलाची आयात पूर्णतः बंद करावी, अशी सूचना अमेरिकेने केल्यामुळे भारतातील शेअरबाजारांची मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने हा इशारा भारतासह आणखी पाच देशांना दिला. आयात न थांबविल्यास निर्बंध घातले जातील असेही अमेरिकेने स्पष्ट केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन  तेलाचे दर वाढले. परिणामी ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याने शेअरबाजाराची घसरगुंडी उडाली आहे.

सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 495.10 अंकांनी घसरून 38,645.18 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 158.35 अंकांच्या घसरणीसह दिवसअखेर 11,594.45 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही घसरण दिसून आली.

सोमवारच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग 3 ते 7 टक्क्यांनी घसरले. या उलट भारती एअरटेल, टीसीएस, इन्फोसिस, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड या कंपन्यांचे समभाग 1 ते 2 टक्के वधारले. कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या जेट एअरवेज या कंपनीचे समभाग दिवसेंदिवस जास्त खाली जात आहेत.

महत्वाच्या बँकांचे तिमाही ताळेबंद लवकरच घोषित होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. ही आकडेवारी घोषित झाल्यानंतर पुन्हा बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक सुधारू शकतो. तथापि, ही बाब ताळेबंदांवर अवलंबून आहे, अशी टिप्पणी काही दलालांनी केली.

सोमवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकंदर 73.08 कोटी रूपयांचे समभाग विकत घेतले. तर देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 68.16 कोटी रूपयांच्या समभागांची विक्री केली अशी माहिती शेअरबाजाराच्या सूत्रांनी दिली.