|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यात आज लोकसभेसाठी मतदान

जिह्यात आज लोकसभेसाठी मतदान 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून दोन हजार 478 केंद्रावर मतदान सुरू होणार आहे. जिह्यातील 23 लाख 63 हजार 158 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपिचंद पडळकर यांच्यासह बारा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचारार्थ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार तोफा थंडावल्या. प्रत्यक्षात प्रचार थांबला असला तरी शेवटची रात्र होती. कार्यकर्ते छुप्या प्रचार करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. जिह्यात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून जिह्यातील 18 लाख 3 हजार 54 मतदार सांगलीचा खासदार ठरविणार आहेत. मतदारसंघातील एक हजार 848 मतदान केंद्र आहेत. हातकणंगले मतदारसंघात इस्लामपूर विधानसभेसाठी दोन लाख 69 हजार 295 आणि शिराळा विधानसभेसाठी दोन लाख 90 हजार 779 मतदार संख्या आहे. लोकसभा मतदारसंघात सुमारे अठरा हजार दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, चालता न येणारे रुग्ण यांचा मतदानात सहभाग सुलभ व्हावा, यासाठी प्रशासनाने विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

व्होटर स्लीप आणि एपिक कार्डचे वाटप पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिह्यासाठी 11 हजार 399 शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रियेत समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 7 हजार 601 अधिकारी व कर्मचारी मदतीला असणार आहेत. 2185 बॅलेट युनिट, 2284 कंट्रोल युनिट आणि 2327 व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

             मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी

सांगली लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता 18 लाख 3 हजार 54 मतदार पात्र आहेत. यामध्ये 8 लाख 73 हजार 749 पुरुष तर 9 लाख 29 हजार 232 स्त्राr मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी 72 मतदार आहेत.  जिल्हाभरात 1848 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 25 केंद्रे क्रिटीकल आहेत. आतापर्यंत 6 हजार 55 सैनिक मतदार तर 12 हजार 327 शासकीय अधिकारी व कर्मचारी टपाली मतदान करणार आहेत. मतदान केंद्रात मोबाईल फोन वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. भयमुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रात मोबाईल, टेलिफोन, आयपॅड, लॅपटॉप किंवा ध्वनीमुद्रण अथवा चित्रीकरण करणाऱया इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

          तिरंगी लढत, बारा उमेदवारांचे भवितव्य होणार मशिनबंद

भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्यातच लढत आहे. असे असले तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बारा उमेदवारांचे भवितव्य मतदानानंतर मशिनबंद होणार आहे. प्रचारार्थ विविध नेत्यांनी प्रचाराचे रान उठवले. प्रचार सांगते दिवशी शेवटच्या दिवशी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाआघाडीच्या प्रचार सांगतेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या सभा झाल्या.

भाजपाच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रचार सभा झाल्या. महाआघाडीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीचे गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली.

           हातकणंगलेत 18 लाख मतदार

दुसरीकडे जिह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. हातकणंगले मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. मात्र, स्वाभिमानीचे नेते तथा खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघातील 18 लाख मतदार हातकणंगलेचा खासदार ठरवणार आहेत. 

                निवडणूक रिंगणातील उमेदवार

शंकरदादा माने (बहुजन समाज पार्टी),

संजयकाका पाटील (भाजप),

आनंद नालगे-पाटील (बळीराजा पार्टी),

गोपिचंद पडळकर (बहुजन वंचित आघाडी),

डॉ. राजेंद्र कवठेकर (बहुजन मुक्ती पार्टी),

विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी पक्ष),

अभिजित आवाडे-बिचुकले (अपक्ष),

अधिकराव चन्ने (अपक्ष),

दत्तात्रय पाटील (अपक्ष),

नारायण मुळीक (अपक्ष),

भक्तराज ठिगळे (अपक्ष),

हिंमत कोळी (अपक्ष)

 

चौकट

 जिह्यातील तालुकानिहाय मतदार संख्या

मिरज- तीन लाख 24 हजार 178

सांगली- तीन लाख 20 हजार 720

पलूस-कडेगाव-दोन 75 हजार 247

खानापूर- तीन लाख 21 हजार 107

तासगाव-कवठेमहाकांळ-दोन लाख 92 हजार 144

जत- दोन लाख 69 हजार 58<8

इस्लामपूर-दोन लाख 69 हजार 295

शिराळा-दोन लाख 90 हजार 779

एकूण-23 लाख 63 हजार 158