|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राजे छत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याची विटंबना

राजे छत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याची विटंबना 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीत सादर देखाव्यावर आक्षेप

प्रतिनिधी/ सोलापूर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान झाल्याचा आरोप करत सोलापुरातील शिवप्रेमींनी सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात धडक मारुन या संबंधी दोषी असणारे बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे तसेच मूर्तीकार आणि पी. बी. ग्रुपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राडा घातला. या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल घोषणा शिवप्रेमींनी दिल्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाद वाढू नये यासाठी समझोत्याचा तह झाला आणि वादावर पडदा पडला. सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पुतळा विटंबना प्रकरणावरुन शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निर्माण झालेली नाजूक परिस्थिती अत्यंत यशस्वीरित्या हाताळली. मराठा सवर्ण आणि दलित बांधवांमध्ये समझोत्याची एक्स्प्रेस दौडती केली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काल रविवारी मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान, बुधवार पेठेतील पी.बी. ग्रुप या मंडळाने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा देखावा सादर केला होता. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात सिंहासनावर विराजमान झालेला आहे ही प्रतिकृती जाणीवपूर्वक करण्यात आल्याची तक्रार शिवप्रेमींनी करत मिरवणुकीमध्ये सादर केलेल्या देखाव्यावर काल रात्रीच आक्षेप घेतला होता. या दरम्यान, काल रात्रीच हा पुतळा पोलिसांनी मिरवणुकीतून बाजूला घेतला होता.

   या अनुषंगाने, सोमवारी सकाळी सकल मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मारली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून याबद्दल समाजाच्या भावना दुखावल्याच्या भावना मांडत याप्रकरणी संबंधीत व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस आयुक्त तांबडे यांच्याकडे आज दुपारी करण्यात आली.

    याबाबत पोलीस आयुक्त तांबडे यांनी सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल नगरसवेक आनंद चंदनशिवे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर सध्या पडदा पडला.

   याप्रसंगी शिवप्रेमी मोठय़ा संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल होते.  माजी उपमाहापौर दिलीप कोल्हे, मराठा महासंघाचे दास शेळके, माजी उपमहापौर नाना काळे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, सकल मराठा समाजाचे समन्वक माऊली पवार तसेच राम जाधव, किरण पवार, योगेश पवार, भाऊ रोडगे, लहू गायकवाड, प्रताप कांचन, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, नगरसेवक चेतन नरोटे, रवि मोहिते, ज्ञानेश्वर सपाटे, नगरसेवक अमोल शिंदे, राजन जाधव, सभागृह नेते संजय कोळी, सोमनाथ राऊत यांचीदेखील उपस्थिती होती.  

आनंद चंदनशिवे यांच्याकडून दिलगिरी

याप्रकरणी पी.बी. ग्रुप मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसवेक आनंद चंदनशिवे म्हणाले आपण भीम आणि शिवप्रेमी आहोत. डॉ. आंबेडकर जयंतीसाठी पुण्याच्या कलाकाराकडून मूर्ती भाडय़ाने आणली होती. कोलंबिया येथील विद्यापीठ इमारतीचा देखावा मागे लावून डॉ. आंबेडकर यांचा पुतळा कंटनेवर ठेवण्यात आला होता. या पुतळ्याला शिवप्रेंमीचा आक्षेप आहे असे समजल्यावर मी स्वतः ही मूर्ती मिरवणुकीतून बाजूला ठेवली व सुभाष आल्हाट या मूर्तीकारकडे परत मूर्ती पाठविली आहे. याप्रकरणी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण आणि मंडळाच्या पदाधिकारी हे सर्वजण दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

डॉ. आंबेडकर, छत्रपतींच्या पुतळ्याला बंदोबस्त

डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली असल्याची तक्रार पोलीस आयुक्त तांबडे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर शहरात संवेदनशिल वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेता काही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने शहरातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिवप्रेमींनी केली घोषणाबाजी

पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवप्रमींनी पोलीस आयुक्तालयासमोर आनंद चंदनशिवे यांच्याविरुध्दात घोषणा बाजी केली. यावेळी सुमारे एक हजार तरुणांनी पोलीस आयुक्तालाया समोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घोषणा दिल्या.

पान 1 वरची चौकट     

अखेर आनंद चंदनशिवेंसह दोषींवर गुन्हा दाखल

रविवारी 21 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. मोठय़ा प्रमाणात साजऱया होणाऱया उत्सवात प्रबुध्द भारत तरुण मंडळानेही देखावा दाखविला होता. दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगावर असलेल्या प्रचलित पोशाखप्रमाणे पोशाख घातलेल्या स्थितीत पुतळा बसविला. यामुळे दोन धर्मियांच्या मध्ये शत्रुत्व व तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयश्त्न केला. याबाबत लतीफ मिलिंद धावणे (वय 23, रा. गोल्ड फिंच पेठ, शिंदे चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नगरसेवक आनंद चंदनशिवे, पी. बी. तरुण मंडळाचे अध्यक्ष अक्षय प्रकाश माने तसेच अन्य पदाधिकारी व मूर्तीकार यांच्या विरुध्द 153 (A), (a) या कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  गुह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांळुखे करीत आहेत.

 अफवा पसरवू नये

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणीही कोणतेही कृत्य करु नये. सामाजिक एकोपा अबाधित रा†िहल असा प्रयत्न सर्वांनी करावा. आवश्यकता वाटल्यास दोन्ही समाजातील लोकांची बैठक घेऊ.

                                   – महादेव तांबडे (पोलीस आयुक्त)