|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांचे निधन

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांचे निधन 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी शहराच्या विकासामध्ये नवे मापदंड निर्माण करणारे व राजकीय पटलावर ‘कार्यसम्राट’ अशी ओळख निर्माण करणारे माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े (54) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने विकासाची दृष्टी असलेले हरहुन्नरी व्यक्तीमत्व    हरपल्याची खंत सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.

  रविवारी रात्री कुटुंबियांसमवेत ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते तेथून घरी परतल्यावर त्यांना उलटी झाली. ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. रूग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणी करून डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली आणि साऱयांनाच धक्का बसला.

  उमेश शेटय़े यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात रत्नागिरीत 80 फूटी रस्ता, भव्य नाटय़गृह, विविध उद्यानांसह अनेक पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागली. त्याच बरोबर रत्नागिरीला एक शहर म्हणून देखणेपणही आले. प्रचंड लोकसंपर्क आणि शहराची खडानखडा माहिती त्यांच्याकडे होती.

   1991 ला रत्नागिरी नगरपरिषदेत ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले. 2001 मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेटय़े दुसऱयांदा नगराध्यक्ष झाले होते. 2006 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्षपदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2011 च्या निवडणूकीत शिवसेनेतून ते पुन्हा नगरसेवक झाले. शिवसेनेकडून कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून त्यांनी विधानपरिषद निवडणूक लढवली होती मात्र त्यात अपयश आले. 2014 मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन शेटय़े यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले होते.

  उमेश शेटय़े यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत रत्नागिरी शहरात अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली.  सुनील तटकरे नगरविकास राज्यमंत्री असताना मैत्रीचा पुरेपूर उपयोग करत उमेश शेटय़े यांनी नगर परिषदेसाठी प्रचंड प्रमाणावर निधी आणला. नगराध्यक्षपदावर असताना संपूर्ण शहरात आणि नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुविधा त्यांनी निर्माण केल्या. शहरातले रुंद रस्ते, जलतरण तलाव, बंद गटारे आणि मलनिस्सारण वाहिन्या, पथदीप, अनेक उद्याने, स्वच्छतेच्या दृष्टीने केलेल्या सुधारणा, सिग्नल व्यवस्था, मुख्य रस्त्यावरचे दुभाजक अशा अनेक कामांची अंमलबजावणी त्यांनी केली.

   त्यामध्ये मोठय़ा शहरांच्या धर्तीवरील सुसज्ज आणि वातानुकूलित  स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह उमेश शेटय़े यांच्याच काळात रत्नागिरीत उभे राहिले. नगरपरिषदेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यास  होता. रत्नागिरीची वेगळी ओळख निर्माण करण्यात व विविध सुधारणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. ‘हे मी केले’ असे अभिमानने बोट दाखवून सांगू शकण्याची ताकद असणारी ते व्यक्तीमत्व होते.

   कार्यतत्पर आणि धडाडीचे नगराध्यक्ष म्हणून उमेश शेटय़े यांचे नाव रत्नागिरीकरांच्या कायम लक्षात राहील. त्यांच्या निधनाने संपूर्ण रत्नागिरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा तेलीआळी येथील निवासस्थानाहून काढण्यात आली. ही अंत्ययात्रा जयस्तंभ मार्गे नगर परिषद व तेथून मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत नेऊन त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिक, मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अशा साऱयांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण रत्नागिरीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

  उमेश शेटय़े यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, माजी खासदार राणे यांनी रूग्णालयात धाव घेतली. नंतर अंतयात्रेत आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडीत, उपनगराध्यक्ज्ञ बंडय़ा साळवी आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.