|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दड्डी-रामेवाडी महालक्ष्मी यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

दड्डी-रामेवाडी महालक्ष्मी यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ 

दड्डी-रामेवाडी महालक्ष्मी यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

वार्ताहर/   शट्टीहळ्ळी

दड्डी-रामेवाडी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव 24 ते 27 एप्रिलपर्यंत पार पडणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

24 रोजी सकाळी 7 वाजता दड्डी व रामेवाडी या दोन्ही गावच्या महालक्ष्मी देवी रथामध्ये स्थानापन्न होऊन वाजत गाजत रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता लक्ष्मी मंदिराजवळ दड्डी महालक्ष्मी देवीचा रथ थांबेल व त्याचठिकाणी स्थानापन्न होईल. तर रामेवाडी लक्ष्मी देवीचा रथ पारंपरिक मार्गाने क्यारमाळ मंदिराकडे प्रस्थान होऊन स्थानापन्न होईल. रात्री 9 वाजता दड्डी-रामेवाडी गावचे सुपुत्र व आकाशवाणी केंद्राचे संगीतकार अनिल कृष्णा मेत्रीसह कलाकार यांचा भरगच्च सुगम संगीत, भक्तीगीत, हास्य रसमंजिरी कार्यक्रम होणार आहे. 10 वाजता धडाका आर्केस्ट्रा-कोल्हापूर यांचा श्रीनिवास कुंभार निर्मित ‘शपथ तुला कुंकवाची’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

25 रोजी सकाळी 8 वाजता रामेवाडीची लक्ष्मी देवी क्यारमाळ मंदिरापासून लक्ष्मी मंदिराकडे प्रस्थान व स्थानापन्न झाल्यानंतर महापूजा व नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. यात्रोत्सवानिमित्त सकाळी 9 वाजता सायकल स्पर्धेचे आयोजन केले असून यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 2111, द्वितीय 1111 व तृतीय 755 रु. अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सकाळी 10 वाजता बैलगाडी शर्यती होणार असून यासाठी 21 हजार 111, 15 हजार 555, 11 हजार 111 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर सकाळी 10.30 वाजता होणाऱया घोडागाडी शर्यतींसाठी 7777, 5555, 3333 अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त येणाऱया सर्व बालचमूंचे मनोरंजन व्हावे यासाठी दुपारी 12 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री 10 वाजता दड्डी-रामेवाडी गावच्या कलाकारांकडून संग्या-बाळय़ा हे कन्नड नाटक होणार आहे.

26 रोजी देवीला नैवेद्य व दंडवत घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 4 वाजता बलभिम तरुण मंडळ दड्डी-रामेवाडी यांच्यामार्फत जंगी कुस्ती होणार आहे. तर रात्री 10 वाजता राधा-कृष्ण हे कन्नड नाटक होणार असून यामध्ये महिला कलाकारांचा सहभाग असणार आहे. 27 रोजी महालक्ष्मी देवीचा सांगता कार्यक्रम होणार असून दुपारी 2 वाजता लक्ष्मी मंदिरासमोर लक्ष्मी देवीला खेळवून देवी पाण्याला जाणार आहे.