|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गंगाधर चडचण हत्येप्रकरणी चौघांना जामीन

गंगाधर चडचण हत्येप्रकरणी चौघांना जामीन 

गुलबर्गा खंडपीठाकडून मंजुरी : मात्र धर्मराज हत्येप्रकरणी राहणार कारागृहात

प्रतिनिधी/ बेंगळूर

विजापूर जिल्हय़ातील गंगाधर चडचण हत्येप्रकरणी चौघा संशयित आरोपींना उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा खंडपीठाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये गंगाधर चडचण यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात संशयित आरोपींविरुद्ध 373 पानी आरोपपत्र दाखल केले होते.

गंगाधर चडचण हत्येप्रकरणी चौघांना जामीन मंजूर झाला असला तरी त्यांच्या विरुद्ध धर्मराज चडचण हत्येप्रकरणी आरोप आहेत. त्यामुळे त्यांची कारागृहातून मुक्तता होणार नाही. चडचण पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक असलेले गोपाल हळ्ळूर, पोलीस सत्यप्पा नायकुडी, सिद्धारूढ रुगी आणि चंद्रशेखर जाधव यांना गुलबर्गा खंडपीठाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. गंगाधर चडचण हत्येप्रकरणी सर्व संशयित आरोपींची सीआयडी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी विजापूरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये धर्मराज चडचण याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तेथे गंगाधर याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तो फरार असल्याचे भासविण्यात आले होते. दरम्यान त्याची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली होती. मात्र, मृतदेह सापडला नव्हता. याप्रकरणी कसून तपास करण्यात येत होता. या प्रकरणामुळे विजापूर जिल्हय़ासह राज्यभर खळबळ उडाली होती.