|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाचक पुन्हा पुस्तकांकडेच वळतील!

वाचक पुन्हा पुस्तकांकडेच वळतील! 

मनीषा सुभेदार / बेळगाव

तंत्रज्ञान प्रगत झाल्याने सोशल मीडियावर पुस्तक वाचण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु एक ना एक दिवस वाचक त्याच्यामध्ये रमणार नाहीत आणि पुन्हा ते पुस्तकाकडेच वळतील, असा विश्वास इब्राहिम इस्माईल पठाण यांनी व्यक्त केला. बेळगावात 1983 पासून जुनी पुस्तके कमी किमतीत वाचकांना उपलब्ध करून देणारे इब्राहिम स्वतः उत्तम वाचक आहेत.

पुस्तक दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा लोक पुस्तकाकडे वळतीलच, असा विश्वास व्यक्त केला. दहावीनंतर ते फारसे पुढे शिकू शकले नाहीत. परंतु पुस्तकांनी त्यांना भरपूर शिकविले. पुस्तकांच्या आवडीपोटीच ते रद्दीच्या दुकानात जाऊन जुनी उत्तमोत्तम पुस्तके खरेदी करून आणत आणि त्यांची विक्री करत. सध्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर ते पुस्तके विकतात. जुन्या पुस्तकांची किंमत कशी ठरविता? या प्रश्नावर मी मूळ पुस्तकाच्या अर्धी किंमत सांगतो. मात्र प्रत्येकवेळी पुस्तक खरेदी करणारी व्यक्ती तेवढेच पैसे देते असे नाही. साधारण खरेदी करणाऱयाची कळकळ किती? हे लक्षात येते. तशावेळी मी अत्यल्प किमतीतही पुस्तक देतो, असे ते म्हणाले.

पुस्तक खरेदी करण्यामध्ये अधिक सहभाग कोणाचा आहे? या प्रश्नावर आजही ज्ये÷ नागरिकच अधिक प्रमाणात खरेदी करतात. त्यामध्येही महिलांचा सहभाग कमी आहे. विद्यार्थी परीक्षेसाठीची पुस्तके घेऊन जातात. या पुस्तकांतून अभ्यास करून त्यांना यश मिळाले तर आवर्जून येऊन सांगतात. अशी आठवणही त्यांनी नोंदविली. पुस्तके येतात कोठून? या प्रश्नावर रद्दीच्या दुकानात जावून मी पुस्तके निवडून आणतो. पुस्तके फाटली असल्यास ती नीट करतो. त्यांना कव्हर घालतो. कधीकधी बायंडींग करतो आणि मगच विक्रीला ठेवतो, असेही त्यांनी सांगितले.

या व्यवसायावरच पोट भरते का? या प्रश्नावर 1983 पासून मी हे काम करत आहे. खरे तर कुटुंबाचा गाडा त्यावर चालत नाही. परंतु घरी पत्नीसुद्धा शिलाईचे काम करून हातभार लावते. त्यामुळे तीन मुले आणि आम्ही असे कुटुंब कसेबसा संसाराचा गाडा पुढे ओढतो, असेही त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या तुलनेत आज पुस्तक खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोशल मीडियाच्या आक्रमणाने वाचन संस्कृतीवरही आक्रमण केले. परंतु एक दिवस तरुण असोत किंवा नागरिक असोत, ते या तंत्रज्ञानाला वैतागणार आहेत आणि पुन्हा पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद घेणार आहेत, असा विश्वास इब्ा्राहिम यांना आहे.