|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्ट्रॉंग रुममधून मतदानाचे साहित्य घेण्यास गर्दी

स्ट्रॉंग रुममधून मतदानाचे साहित्य घेण्यास गर्दी 

लहान मुलांसह महिला कर्मचाऱयांचीही धडपड, उन्हामुळे सर्वच जण त्रस्त

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवार दि. 23 रोजी होत आहे. यामुळे सोमवारीच स्ट्रॉंगरुममधून बॅलेट युनिट तसेच ईव्हीएम व इतर साहित्य घेण्यासाठी बी. के. मॉडेल स्कूल येथे मोठी झुंबड उडाली होती.  लहान मुलांसह आलेल्या महिला हे साहित्य घेण्यासाठी धडपड करत होत्या. या साहित्यासह कर्मचाऱयांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी केएसआरटीसीच्या बसेसबरोबरच खाजगी वाहनेही तैनात करण्यात आली होती. यामुळे बी. के. मॉडेल स्कूल व परिसरात मोठी गर्दी झाली होती.

बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 4 हजार 434 केंदे आहेत. त्या केंद्रांमध्ये ईव्हीएम तसेच बॅलेट युनिट यंत्रे नेण्यासाठी बी. के. मॉडेल स्कूल येथे कर्मचारी जमले होते. सकाळपासूनच मतदान केंद्रांनुसार त्याचे वाटप करण्यात येत होते. बेळगाव लोकसभा मतदार संघामधील मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रे या ठिकाणी वाटप करण्यात आली. महिला कर्मचारी लहान मुलांसह त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांना ही यंत्रे घेण्यासाठी रांगेत उभे राहून मोठी धडपड करावी लागत होती. उन्हातच धावपळ करुन ही यंत्रे घ्यावी लागत होती. यामुळे महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला.

35 हजार कर्मचाऱयांची नेमणूक

जिल्हय़ामध्ये या दोन्ही मतदारसंघांसाठी 35 हजार कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव लोकसभेसाठी जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. 4 हजार 434 मतदान केंद्रांमधील निम्यापेक्षा अधिक मतदान केंदे बेळगाव मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे मतदानयंत्रांची संख्याही अधिक होती. मतदानयंत्रे घेतल्यानंतर मतदान केंद्रांवर जाणाऱया बसमध्ये बसावे लागत होते. बस शोधण्यासाठीही कर्मचाऱयांची धावपळ उडाली होती. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 57 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चार बॅलेट युनिट उपलब्ध करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील चार बॅलेट युनिट कर्मचाऱयांना घ्यावे लागत होते. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, ईव्हीइम  व इतर मतदानाचे साहित्य घेऊन त्यानंतर स्वतःची बॅग कर्मचाऱयांना घ्यावी लागत होती. यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. महिला कर्मचाऱयांना तर लहान मुले घेऊनच हे साहित्य न्यावे लागत होते. यामुळे अनेक कर्मचाऱयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

बी. के. मॉडेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

बी. के. मॉडेल येथे स्ट्राँगरुम असल्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंदानुसार बॅलेट युनिट तसेच इतर साहित्य वाटप करण्यात येत होते. त्यावेळी पुरेपूर काळजी घेण्यात येत होती. बॅलेट युनिट, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट क्रमांकानुसार देण्यात येत होते. त्यावेळी कर्मचाऱयांना माहितीही दिली जात होती. त्याची जोडणी करण्यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येत होते. एकूणच योग्य प्रकारे वितरण करण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र काहीसा गोंधळ उडत होता. 

खासगी वाहनांचा वापर

सरकारी बसेसबरोबरच खासगी वाहनांचाही वापर यावषी करण्यात आला आहे. अनेक प्रवासी टेम्पोंना अडवून त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यांनाही विविध मतदान केंद्रांवर कर्मचारी तसेच साहित्य पोहोचविण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी टेम्पोंचालकांतून नाराजी व्यक्त होत होती.