|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आज करा बिनधास्त मतदान…

आज करा बिनधास्त मतदान… 

पोलिसांबरोबरच निवडणूक कर्मचारी सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणूक मंगळवार दि. 23 रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. मंगळवारी सकाळी 7 पासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 6 पर्यंत मतदान करण्यास वेळ मिळणार आहे. तेव्हा जनतेने बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्हय़ात बेळगाव आणि चिकोडी असे दोन मतदारसंघ असून कारवार मतदारसंघातीलही काही मतदान केंदे बेळगाव जिल्हय़ात आहेत. जिल्हय़ामध्ये एकूण 37 लाख 73 हजार 990 मतदार आहेत. त्यामध्ये 19 लाख 10 हजार 731 पुरुष तर 18 लाख 63 हजार 133 महिला मतदार आहेत तर इतर 126 मतदार आहेत. मतदानासाठी एकूण 4 हजार 434 मतदान केंदे स्थापन करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 35 हजार कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून ते आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.

मतदानासाठी ही कागदपत्रे चालू शकतात

: वाहन चालविण्याचा परवाना

: पासपोर्ट

: केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करत असाल तर त्याचे ओळखपत्र

?ः पोस्ट खाते किंवा बँक खाते

: पॅनकार्ड

: आधारकार्ड

: उद्योग खात्रीमध्ये काम करत असल्यास स्मार्ट कार्ड

: विमा कार्ड

: पेन्शन कार्ड

दिव्यांगांसाठी राहणार विशेष सोय

दिव्यांग आहात म्हणून मतदान करायचे थांबू नका, तर तुमच्यासाठीही योग्य ती सोय करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. जिल्हय़ामध्ये एकूण 24 हजार 918 दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्यासाठी व्हिलचेअर आणि वाहनांची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर अंध व्यक्ती असेल तर त्यांना 18 वर्षांखालील एक स्वयंसेवकही देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाईलवर असणार बंदी

मतदान केंद्रांमध्ये मोबाईलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून मतदान करतानाही मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही. तेव्हा मतदारांनी आपला मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे कळविण्यात आले आहे.

आठवडी बाजारांवर आणि यात्रांवर बंदी

लोकसभा निवडणूक असल्यामुळे विविध गावांमध्ये भरणारे बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. याचबरोबर मंगळवारी यात्राही रद्द कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार आणि यात्रांवर बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी विशाल आर. यांनी तहसीलदारांना दिला आहे. त्यामुळे मंगळवारी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.