|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » पंत, धवनच्या झंझावाताने दिल्ली अग्रस्थानी

पंत, धवनच्या झंझावाताने दिल्ली अग्रस्थानी 

जयपूर / वृत्तसंस्था

ऋषभ पंत व शिखर धवन यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी झालेल्या आयपीएलमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 6 गडय़ांनी विजय मिळवित गुणतक्त्यात पहिले स्थान मिळविले. केवळ 36 चेंडूत नाबाद 78 धावांची तुफानी खेळी करणाऱया ऋषभ पंतला सामनावीराचा बहुमान मिळाला.

नेतृत्वाचे ओझे उतरवले गेल्यानंतर अजिंक्य रहाणेने मनमुराद फटकेबाजी करत 63 चेंडूत नाबाद 105 धावांची आतषबाजी केल्यामुळे प्रथम फलंदाजी मिळाल्यावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात 6 बाद 191 धावांची मजल गाठली. अर्थात, रहाणेसाठी आयपीएलमध्ये तब्बल सात वर्षांनंतर झळकावलेले हे पहिलेच शतक ठरले असून या स्पर्धेत त्याच्या खात्यावर एकूण दोन शतकेच नोंद आहेत. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथने 32 चेंडूत दिलेले 50 धावांचे योगदान राजस्थानसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 4 चेंडू बाकी असताना विजयाचे उद्दिष्ट 4 गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. शिखर धवनने धडाकेबाज सुरुवात करून देताना पृथ्वी शॉमसवेत 7.3 षटकांत 72 धावांची सलामी दिली. पण पंतने त्यावर कळस चढवताना धुवाधार फटकेबाजी करीत विजय साकारण्यात मोलाची भूमिका बजावली. पंतने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

धवनने 27 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार, 2 षटकारांसह 54 धावा फटकावल्या तर दुय्यम भूमिका स्वीकारलेल्या शॉने 39 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारांच्या मदतीने 42 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यर 4 धावांवर बाद झाला तर रुदरफोर्डने 5 चेंडूत 11 धावा फटकावल्या. इन्ग्राम 3 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानच्या श्रेयस गोपालने 47 धावांत 2 बळी मिळविले तर धवल कुलकर्णी व पराग यांनी एकेक बळी टिपला.

रहाणेची फटकेबाजी

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि संजू सॅमसन एकही चेंडू न खेळताच धावबाद झाल्याने यजमान संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर मात्र रहाणे व स्टीव्हन स्मिथ या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 13 षटकात प्रत्येकी 10 च्या सरासरीने 130 धावांची दमदार भागीदारी साकारत धावसंख्येला आकार दिला. या उभयतांनीही चौफेर फटकेबाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना अगदी नामोहरम केले. स्टीव्हन स्मिथ अर्धशतक झळकावल्यानंतर लगेच पटेलच्या गोलंदाजीवर मॉरिसकडे झेल देत तंबूत परतला तर अजिंक्य रहाणेने मात्र मोठी खेळी साकारताना 58 चेंडूत शतक साजरे केले. अंतिमतः तो 63 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारांसह 105 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानसाठी मधल्या फळीतील फलंदाज मात्र अगदीच अपयशी ठरले. बेन स्टोक्स (8), ऍस्टॉन टर्नर (0), रियान पराग (4) स्वस्तात बाद झाले. स्टुअर्ट बिन्नीने 13 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा जमवल्या. टर्नर आयपीएलमध्ये सलग पाचव्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

दिल्लीतर्फे गोलंदाजीच्या आघाडीवर दक्षिण आफ्रिकन स्पीडस्टार कॅगिसो रबाडा किफायतशीर ठरला. त्याने 4 षटकात 37 धावात 2 बळी घेतले. याशिवाय, आघाडीचा जलद गोलंदाज इशांत शर्मासह (1-29), अक्षर पटेल (1-39), ख्रिस मॉरिस (1-41) यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : 20 षटकात 6 बाद 191 (अजिंक्य रहाणे 63 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 105, स्टीव्हन स्मिथ 32 चेंडूत 8 चौकारांसह 50, स्टुअर्ट बिन्नी 13 चेंडूत 2 चौकारांसह 19. अवांतर 5. कॅगिसो रबाडा 4 षटकात 2-37, इशांत, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस प्रत्येकी 1 बळी).

दिल्ली कॅपिटल्स 19.2 षटकांत 4 बाद 193 : पृथ्वी शॉ 42 (39 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), धवन 54 (27 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), अय्यर 4, ऋषभ पंत नाबाद 78 (36 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), रुदरफोर्ड 11 (5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), इन्ग्राम नाबाद 3, अवांतर 1, गोलंदाजी : एस.गोपाल 2-47, आर. पराग 1-25, धवल कुलकर्णी 1-51.