|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » स्वप्ना बर्मन, मिश्र रिलेत भारताला रौप्य

स्वप्ना बर्मन, मिश्र रिलेत भारताला रौप्य 

आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप : संजीवनी जाधवला कांस्य, जिन्सन जॉन्सनची माघार

वृत्तसंस्था/ दोहा

आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॅथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकलेल्या स्वप्ना बर्मनने तसेच 4ƒ400 मी. मिश्र रिले संघाने आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेच्या तिसऱया दिवशी रौप्यपदके पटकावली तर संजीवनी जाधवने दहा हजार मी. शर्यतीत कांस्यपदक मिळविले.

22 वर्षीय स्वप्नाने सात क्रीडा प्रकारांत मिळून एकूण 5993 गुण मिळवित दुसरे स्थान पटकावले. सुवर्ण जिंकलेल्या उझ्बेकिस्तानच्या एकतेरिना व्होरनिनाने 6198 गुण मिळविले. भारताच्या पूर्णिमा हेम्ब्रमने 5528 गुण घेत पाचवे स्थान मिळविले. 2017 मध्ये या स्पर्धेत स्वप्नाने सुवर्ण जिंकले (5942) त्यापेक्षा जास्त गुण तिला यावेळी मिळाले. पण गेल्या वर्षी जकार्तात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या 6026 गुणांपेक्षा ते कमी होते.

4ƒ400 मी. मिश्र रिले हा क्रीडा प्रकार पहिल्यांदाच या स्पर्धेत घेण्यात आला असून भारताच्या मुहम्मद अनास, एमआर पुवम्मा, व्हीके विस्मया, राजीव अरोकिया यांनी 3:16.47 से. अवधी घेत दुसरे स्थान मिळविले. बहरिनच्या चौकडीने पहिले स्थान घेत सुवर्ण पटकावले. 22 वर्षीय संजीवनी जाधवने दहा हजार मी. शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत तिसरे स्थान घेतले. तिने 32 मिनिटे 44.96 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. बहरिनच्या शिताये हब्तेगेब्रेलने (31:15.62) सुवर्ण, जपानच्या हितोमी नीयाने (31:22.63) रौप्यपदक पटकावले. या दोन रौप्य व एक कांस्यपदकासह मंगळवारी भारताने पदकतक्त्यात चौथे स्थान मिळविले होते. भारताने 2 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्यपदके मिळविली होती.

महिलांच्या 4ƒ100 मी. रिले शर्यतीत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुती चंद, अर्चना सुसीत्रा, रेवती वीरामनी, कुन्नथ रंगा यांनी 43.81 सेकंद वेळ नोंदवली. पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीत अजय कुमार सरोजने अंतिम फेरी गाठली तर जिन्सन जॉन्सनने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला. त्याने 800 मी. अंतिम फेरीतही भाग घेतला नाही.  पहिल्या दिवशी रविवारी हिमा दासने पाठदुखीमुळे 400 मी. शर्यतीतून माघार घेतली होती तर भालाफेकपटू नीरज चोप्रा, 400 मी. हर्डल्सचा राष्ट्रीय विक्रमवीर धरुण अय्यासामी, लांब उडीपटू एम.श्रीशंकर यांनीही दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.