|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » अंकिता रैनाचा स्टोसुरला धक्का

अंकिता रैनाचा स्टोसुरला धक्का 

वृत्तसंस्था/ ऍनिंग, चीन

भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैनाने माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन समंथा स्टोसुरचा धक्कादायक पराभव करून कुनपिंग ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले.

अंकिता ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यविजेती असून तिने ऑस्ट्रेलियाच्या स्टोसुरचे आव्हान 7-5, 2-6, 7-5 असे संपुष्टात आणले. दोन तास 50 मिनिटे ही झुंज रंगली होती. 26 वर्षीय अंकिताला आपली सर्व्हिस राखताना झगडावे लागत होते. तिने पूर्ण सामन्यात केवळ तीन बिनतोड सर्व्हिस केल्या. स्टोसुरने मात्र सात बिनतोड सर्व्हिस केल्या. मात्र जागतिक क्रमवारीत 77 व्या स्थानावर असणाऱया स्टोसुरने जास्त चुका (18 डबल फॉल्ट्स) केल्या तर अंकिताने केवळ सहा चुका केल्या. अंकिताची पुढील लढत चीनच्या काइ लिन झँगशी होईल.

अंकिता जागतिक क्रमवारीत 178 व्या स्थानावर असून या महिन्यात इस्तंबुलमध्ये झालेल्या आयटीएफ स्पर्धेत तिने उपविजेतेपद मिळविले होते. महिला एकेरीच्या मानांकनात पहिल्या 200 मध्ये स्थान मिळविणारी अंकिता ही तिसरी खेळाडू असून गेल्या वर्षी तिने हा पराक्रम केला. याआधी सानिया मिर्झा व निरुपमा वैद्यनाथन यांनी एकेरीत 200 मध्ये स्थान मिळविले होते. स्टोसुरने 2011 मध्ये अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकताना सेरेना विल्यम्सला पराभूत केले होते. दुहेरीतील ती माजी अग्रमानांकित असून सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात 2005 अमेरिका ओपन, 2006 पेंच ओपन, 2019 ऑस्ट्रेलिया ओपन (महिला दुहेरी) आणि 2005 ऑस्ट्रेलिया ओपन, 2008 व 2014 विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये मिश्र दुहेरीत मिळविलेल्या जेतेपदांचा समावेश आहे.