रशियन सहकारी कॅमिलाच्या साथीने फिलीप आयलंड चषकावर शिक्कामोर्तब
मेलबर्न / वृत्तसंस्था
भारताच्या अंकिता रैनाने शुक्रवारी आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले डब्ल्यूटीए अजिंक्यपद जिंकत दुहेरीत कारकिर्दीत प्रथमच 100 च्या आतील मानांकनही संपादन केले. तिने रशियन सहकारी कॅमिला रखिमोव्हाच्या साथीने पिछाडी भरुन काढत फिलीप आयलंड स्पर्धेच्या दुहेरीचे जेतेपद खेचून आणण्याचा पराक्रम साधला. दुहेरीतील पहिल्या 100 मध्ये स्थान संपादन करणारी अंकिता ही सानिया मिर्झानंतर केवळ दुसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरणार आहे. सानिया मिर्झा सहावेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे.
अंकिता व कॅमिला जोडीने रशियन ऍना ब्लिन्कोव्हा व ऍनास्तासिया पोतापोव्हा या जोडीला निर्णायक अंतिम लढतीत 2-6, 6-4, 10-7 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. वास्तविक, ऍना व ऍनास्तासिया यांनी पहिला सेट जिंकून जोरदार सुरुवात केली होती. पण, अंकिता व कॅमिला यांनी दुसऱया सेटपासून आणखी जिद्दीने खेळ साकारला व दुसरा सेट जिंकत हा सामना बरोबरीत आणला आणि नंतर तिसरा सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
280 मानांकन गुणांची कमाई
28 वर्षीय अंकिता व कॅमिला जाडीने या विजयासह 8 हजार डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली. शिवाय, 280 मानांकन गुणही प्राप्त केले. या मानांकन गुणांमुळे अंकिता पुढील आठवडय़ात जाहीर केल्या जाणाऱया मानांकन यादीत पहिल्या 100 मध्ये पोहोचणार आहे. सध्या ती दुहेरीत 115 व्या स्थानी असून सोमवारी ती नव्या यादीत 94 व्या झेपावलेली असणार आहे.
मागील दोन आठवडे संस्मरणीय
अंकिता रैनासाठी मागील दोन आठवडे विशेष संस्मरणीय ठरले असून प्रारंभी तिने ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुहेरीत आपले ग्रँडस्लॅम पदार्पण नेंदवले. शिवाय, नंतर डब्ल्यूटीए एकेरी स्पर्धेच्या मुख्य फेरीत साखळी सामना जिंकण्याचा पराक्रमही गाजवला. ही कामगिरी व निकाल नजरेसमोर ठेवत, अंकिताने आता एकेरीतही टॉप-100 मध्ये स्थान संपादन करण्याचे आपले लक्ष्य असेल, असे म्हटले आहे.
उपांत्य फेरीत मॅचपॉईंटवेळी देखील अंकिता व कॅमिला मागे होते. पण, अंकिताने काही उत्तम व्हॉलीज लगावले आणि यामुळे या जोडीला सामन्यात परतता आले होते. एरवी, भारतीय टेनिसपटूंना आर्थिक आघाडीवर पुरेसे पाठबळ मिळवण्यासाठी बरेच झगडावे लागते. पण, अंकिताने अशी कोणतीही तक्रार केली नाही. याउलट तिने आपल्याला सहकार्य करणाऱया सर्व घटकांचे मनापासून आभार मानले.
5 फूट 4 इंच उंचीच्या अंकिताला आपल्यापेक्षा अधिक उंच प्रतिस्पर्धी समोर असताना काही वेळा झगडावे लागले. पण, ही काही समस्या नाही, असे अंकिता याबद्दल बोलताना म्हणाली. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूंशी तुलना करता काही खेळाडू माझ्यापेक्षा बारीक आहेत आणि खुजेही आहेत. पण, यामुळे फारसा फरक पडतो असे मला वाटत नाही. माझी उंची साधारण आहे आणि आपल्या खेळातील बलस्थानावर अधिक मेहनत घेणे, यावर माझे यापुढेही लक्ष केंद्रित असेल’, याचा तिने पुढे उल्लेख केला.
पायाभूत सुविधा आवश्यक
खेळाच्या पायाभूत सेवासुविधा असणे अतिशय महत्त्वाचे असते. अहमदाबादला मी जिथे राहते, त्याच्या मागेच टेनिस कोर्ट, टेनिस अकादमी आहेत आणि ते कोर्ट, अकादमी तिथे नसते तर मी आज इथे तुम्हाला दिसलेही नसते’, असे अंकिताने पुढे नमूद केले. अंकिता यानंतर पुढील आठवडय़ापासून सुरु होणाऱया ऍडलेड इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होणार आहे.
ड्रॉ जाहीर होण्यापूर्वी केवळ 20 मिनिटे आधी…
अंकिता व कॅमिला यांनी या स्पर्धेत संस्मरणीय जेतेपदावर शिक्कामोर्तब केले असले तरी प्रत्यक्ष स्पर्धेच्या ड्रॉला अवघी 20 मिनिटे बाकी असताना या उभयतांनी एकत्रित खेळण्याचा निर्णय घेतला होता, अशी आश्चर्यकारक बाब त्यांच्या या जेतेपदानंतर उघडकीस आली.
‘आमच्यासाठी हा आठवडा अतिशय दमदार राहिला. मी व कॅमिला प्रथमच एकत्रित खेळत होतो. ड्रॉ जाहीर होण्यापूर्वी केवळ 20 मिनिटांआधीच आम्ही एकमेकांसमवेत खेळण्याचा निर्णय घेतला. कारण, नोंदणी यादीत बराच गेंधळ होता. कॅमिला अगदी आक्रमक खेळते. तिचे फटके उत्तम आहेत आणि मी फक्त तिला नेटजवळ आक्रमक खेळावर भर देण्याची सूचना केली. ती तिने तंतोतंत पार पाडली. अर्थात, हा ड्रॉ अतिशय सोपा नव्हता. आम्ही काही अव्वल दर्जाच्या खेळाडूंना सामोरे गेलो आणि विजयश्री खेचून आणली’, असे अंकिता या स्पर्धेतील एकंदरीत प्रवासाबद्दल बोलताना म्हणाली.