प्रतिनिधी / सांगली
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि सांगली–मिरज–कुपवाड शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरांच्या राजीनाम्याचे नाट्य अखेर सोमवारी सायंकाळी संपुष्टात आले. आज महासभेत दिवसभर विविध विषयांवर वादळी चर्चा झाल्यानंतर सायंकाळी महापौर संगीता खोत व उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले असून महापालिका प्रशासनाकडून विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे हे राजीनामे पाठवल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. नूतन महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री सुभाष देशमुख, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार संजय काका पाटील आदी नेते मंडळी कोणाला संधी देतात याकडे मनपा क्षेत्रातील लक्ष लागून राहिले आहे
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापौर व उपमहापौरांना राजीनामा देण्याचे आदेश शनिवारीच दिले होते. त्यानुसार उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी तत्काळ राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. मात्र महापौर संगीता खोत यांनी 26 जानेवारीला ध्वजवंदन केल्यानंतर राजीनामा देऊ, अशी विनंती केली होती. त्याला पक्षश्रेष्ठींनी नकार दिला होता.
महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान संगीता खोत यांना मिळाला होता. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली होती. सुरुवातीला दोघांनाही सव्वा वर्षांची संधी देण्यात आली होती. पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांच्या राजीनाम्याचा विषय लांबणीवर पडला होता. अखेर आज खोत आणि सूर्यवंशी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले.