लेंडीनाल्याची अवस्था, पुन्हा महापूर येण्याची भीती, अधिकाऱयांकडून दिशाभूल
प्रतिनिधी/ बेळगाव
लेंडीनाला आणि बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा झाला तर शहराला पुराचा फटका बसणार नाही. मात्र, या नाल्यांची खोदाई झाली नाही तर पुन्हा यावषीही महापुराचा फटका शहराला बसणार हे निश्चित आहे. लेंडी नाल्याची खोदाई पूर्ण झाल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र शेतकरी म्हणतात, अजून दीड कि.मी. नाल्याची खोदाई होणे बाकी आहे. एकूणच या प्रकारामुळे अधिकारी दिशाभूल करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लेंडी नाल्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर गेल्या होत्या. यावेळी त्यांना नाल्याची पूर्ण खोदाई झाली का? असे विचारले असता त्यांनी नाल्याची राष्ट्रीय महामार्गापर्यंत खोदाई झाल्याचे सांगितले. मात्र शेतकऱयांना याबाबत कोणतीही माहिती नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्याशी संपर्क साधला असता अजून दीड कि.मी.पर्यंतच्या नाल्याची खोदाई होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे लेंडी नाल्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात आहे. नाला अरुंद असल्यामुळे शेतकरी अशोक पावशे यांच्या शेताजवळ हा नाला फुटून शिवारात पाणी गेल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाशेजारी खोदाई करण्यासाठी मोठय़ा जेसीबीची गरज आहे. तो जेसीबी उपलब्ध झाला तरच खोदाई होऊ शकते, असे शेतकऱयांनी महापालिका आयुक्तांना सांगितले होते. त्यांनी त्यावर तो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पावसामुळे सध्या तरी काम करणे अशक्मय आहे. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर अर्धवट काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
लेंडी नाल्याची खोदाई झाली नाही तर यावषीही शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर शहरालाही महापुराचा फटका बसू शकतो. तेव्हा खोदाई झाली असे न सांगता योग्य प्रकारे खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे. अधिकाऱयांनीही शेतकऱयांची किंवा जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन शेतकऱयांनी केले आहे.