ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झालेल्या चार भारतीय पायलटचे प्रशिक्षण रशियातील लॉकडाऊनमुळे थांबले आहे. भारतीय हवाई दलाच्या चार फायटर पायलटचे रशियामध्ये अंतराळवीर बनण्याचे प्रशिक्षण सुरु होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने हे प्रशिक्षण काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. ग्लाव्हकॉसमॉसचे महासंचालक दिमित्री लॉसक्युतोव्ह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रशियातील मॉस्को जवळच्या स्टार सिटीमधील गागारीन कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे चारही पायलट अंतराळवीर बनणार आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रशियात लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या हे पायलट्स घरामध्ये आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे.
ग्लाव्हकॉसमॉस ही रशियातील अवकाश कंपनी आहे. भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जून २०१९ मध्ये ग्लाव्हकॉसमॉस आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्यामध्ये करार झाला आहे. त्यानुसार या चार फायटर पायलट्सला प्रशिक्षण देण्यात येत होते.