तिसऱ्या दिवशी सेलिंगमध्ये नेहाला रौप्य, अलीला कांस्य, स्क्वॉशमध्ये
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
भारताच्या अश्वदौडमधील चौकडीने ड्रेसेज या प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे या प्रकारातील एकंदर दुसरे सुवर्ण आहे. याशिवाय सेलिंग या क्रीडा प्रकारात 17 वर्षीय नेहा ठाकुरने रौप्य तर इबाद अलीने कांस्यपदक मिळविले. मंगळवारी भारताने एकूण तीन पदकांची कमाई केली असून त्यांची एकूण पदकसंख्या 14 झाली आहे. त्यात 3 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
अश्वदौडमधील ड्रेसेज या प्रकारात सुदिप्ती हजेला, दिव्याकृती सिंग, विपुल हृदय छेडा व अनुश अगरवाला यांनी अपेक्षापूर्ती करीत सुवर्ण पटकावले. निवड चाचणीवेळी या चौकडीने शानदार प्रदर्शन केले होते. चाचणीवेळी आशियाई स्पर्धेत याआधी पदक मिळविणाऱ्यांशी त्यांची गुणसंख्या एकतर समान होत होती किंवा त्यांच्यापेक्षा सरस होत होती. ही चौकडी या स्पर्धेत पदक जिंकणार हे तेव्हाच निश्चित झाले होते. पण पदकाचा रंग कोणता हे ठरायचे होते.
भारतीय चौकडीने एकूण 209.205 टक्के गुण मिळवित पहिले स्थान मिळविले. चीनच्या खेळाडूंनी 204.882 टक्के गुण घेत दुसरे, हाँगकाँगच्या खेळाडूंनी 204.852 टक्के गुण घेत तिसरे स्थान मिळविले. यापूर्वी 1986 मधील स्पर्धेत भारताने या प्रकारात शेवटचे पदक जिंकले होते. त्यावेळी कांस्यपदक भारताला मिळाले होते. नवी दिल्लीत 1982 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने अश्वदौडच्या इव्हेंटिंग व टेंट पेगिंगमध्ये तीन सुवर्णपदके मिळविली होती. 1982 मध्ये वैयक्तिक इव्हेंटिंगमध्ये रघुबिर सिंगने तसेच सांघिक इव्हेंटिंगमध्ये गुलाम मोहम्मद खान, बिशाल सिंग व मिल्खा सिंग यांच्यासमवेत सुवर्ण मिळविले होते आणि वैयक्तिक टेंट पेगिंगमध्ये रुपिंदर सिंग ब्रारने भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले होते.
ड्रेसेज या प्रकारात अश्व व त्याचा स्वार यांच्या कामगिरीच्या आधारे दहापैकी गुण दिले जातात. प्रत्येक स्वाराचे एकूण गुण घेतल्यानंतर त्यांची टक्केवारी काढण्यात येते आणि सर्वाधिक टक्केवारी असणाऱ्याला विजेता ठरविण्यात येते. येथे जेतेपद मिळविणाऱ्यांत 21 वर्षीय सुदिप्ती इंदोरची असून 23 वर्षीय दिव्याकृती जयपूरची रहिवासी आहे. 25 वर्षीय विपुल मुंबईचा तर 23 वर्षीय अनुश कोलकात्याचा आहे. अनुश सध्या जर्मनीतील बोर्शेन येथे वास्तव्यास आहे.
सेलिंगमध्ये नेहाला रौप्य, अलीला कांस्य
निंगबो येथे झालेल्या सेलिंग क्रीडा प्रकारात भारताच्या 17 वर्षीय नेहाने रौप्य पटकावत भारताला दिवसातील पहिले पदक जिंकून दिले. मुलींच्या डिंघी आयएलसीए-4 मध्ये तिने दुसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या विंडसर्फर आरएस : एक्स इव्हेंटमध्ये भारताला सेलिंगमधील दुसरे पदक मिळवून देताना इबाद अलीने एकूण 52 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. थायलंडच्या नथाफाँग फोरोफरातने रौप्य तर कोरियाच्या वोनवू चोने सुवर्णपदक पटकावले.
14 रेसच्या या इव्हेंटमध्ये अलीची दुसऱ्या व तिसऱ्या रेसमध्ये एकदम खराब कामगिरी झाली. या शर्यती त्याला पूर्ण करता आल्या नाहीत. मुलींच्या विभागात नेहाने 32 गुण घेतले. पण 27 नेट स्कोअरमुळे तिला दुसरे स्थान मिळाले. थायलंडच्या खेळाडूने सुवर्ण, सिंगापूरच्या कायरा कार्लाइलने 28 नेट स्कोअरसह कांस्यपदक मिळविले.
स्क्वॉशमध्ये भारताचे पाक, सिंगापूरवर विजय
स्क्वॉश या क्रीडाप्रकारात भारताच्या पुरुष व महिला संघांनी अनुक्रमे सिंगापूर व पाकवर विजय मिळवित शानदार सुरुवात केली. महिला संघात 15 वर्षीय अनाहत सिंग, अनुभवी जोश्ना चिनाप्पा, तन्वी खन्ना यांचा समावेश असून त्यांनी गट ब मधील लढतीत पाकचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अनाहतने सादिया गुलचा केवळ 16 मिनिटात पराभव केला तर जोश्नाने सहाव्या आशियाई स्पर्धेत खेळताना केवळ 13 मिनिटांत नूर उल हुडा सादिकचा 11-2, 11-5, 11-7 असा फडशा पाडला. नंतर तन्वीने नूर उल अईन इजाझवर मात केली. मागील आवृत्तीत भारताने रौप्यपदक मिळविले होते.
पुरुष स्क्वॉशमध्ये भारताला अग्रमानांकन असून सिंगापूरवर त्यांनी 3-0 अशी मात केली. हरिंदर पाल संघूने जेरॉम क्लेमेंतवर चार गेम्समध्ये विजय मिळविला तर सौरव घोषालने सॅम्युअल कांगचा आणि अभय सिंगने मार्कस फुआचा पराभव केला. भारताची पुढील लढत कतारविरुद्ध होत आहे. भारताच्या गटात पाक, कुवैत, नेपाळ यांचाही समावेश आहे. मागील आवृत्तीत भारताला कांस्य मिळाले होते.
टेनिसमध्ये नागल, अंकिता उपांत्यपूर्व फेरीत, रामकुमार, रुतुजा पराभूत
टेनिस एकेरीत सुमित नागल व अंकिता रैना यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठत पदक जिंकण्याच्या आशा निर्माण केल्या आहेत. सुमितने कझाकच्या बेबिट झुकायेव्हचा 7-6 (11-9), 6-4 असा पराभव केला तर महिला एकेरीत अंकिताने हाँगकाँगच्या आदित्या पी. करुणारत्नेचा 6-1, 6-2 अशा फडशा पाडला. उपांत्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते.
रुतुजा भोसलेला फिलिपाईन्सच्या अलेक्झांड्रा इआलाने 7-6 (7-5), 6-2 असे हरविले तर पुरुषांच्या एकेरीत रामकुमार रामनाथनला योसुके वाटानुकीने 7-5, 6-7 (3-7), 7-5 असे हरवित आगेकूच केली. रामकुमार व रुतुजा यांची मिश्र दुहेरीत अजून आशा असून रुतुजा व करमन कौर थांडी यांना महिला दुहेरीत थायलंडच्या जोडीकडून हार पत्करावी लागली. पुरुष दुहेरीत सुवर्णपदकाचे दावेदार असलेल्या रोहन बोपण्णा व युकी भांब्री यांचे आव्हान प्रारंभीच समाप्त झाले आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या युकी भांब्री व अंकिता रैना यांनी पाकिस्तानी जोडीचा 6-0, 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित पुढील फेरी गाठली.
दिव्यांश-रमिताचे कांस्य थोडक्यात हुकले
10 मी. मिश्र सांघिक एअर रायफल नेमबाजीत भारताच्या दिव्यांश पन्वर व रमिता जिंदाल यांचे कांस्यपदक अगदी थोडक्यात हुकले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत पदक मिळाले नाही. दक्षिण कोरियाच्या पार्क हजुन व ली युनसेव यांनी कांस्य मिळविताना भारतीय जोडीला 20-18 असे हरविले. दुसरे कांस्यपदक कझाकला मिळाले. दिव्यांश-रमिता यांनी एकूण 628.2 गुण नोंदवले
बॉक्सिंग : सचिन उपउपांत्यपूर्व फेरीत
भारतीय बॉक्सर सचिन सिवाचने पुरुषांच्या 57 किलो वजन गटातील पहिल्या लढतीत आक्रमक ठोसेबाजी करीत इंडोनेशियाच्या बॉक्सरवर विजय मिळविला. त्याची पुढील लढत कुवैतच्या तुर्की अबुकुथैलाहविरुद्ध होईल. महिलांच्या फेन्सिंगमध्ये भारताच्या भवानी देवीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. तिने आधीच्या दोन फेऱ्यांत सिंगापूर व सौदी अरेबियाच्या खेळाडूंवर विजय मिळविले होते.