कडधान्ये सोडल्यास रोज आमटी कोणती करायची, हा प्रश्न गृहिणींसमोर रोज उभा असतो. अशावेळी आपल्याला मूड असेल आणि जरा वेळ असेल तर वेगवेगळय़ा राज्यातील निरनिराळय़ा पाककृती करून चव पाहायला काय हरकत आहे? आज आपण पाहूया, आंध्र प्रदेशातील ‘वांगी करी’…दक्षिणेकडे बहुधा उकडा भात व नारळाचा वापर जेवणात जास्त असतो.
साहित्यः पाव किलो वांगी, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, अर्धा चमचा खसखस, 1 लवंग, गुळाचा लहानसा खडा चवीपुरता, अर्धा चमचा लाल मिरचीपूड, चिमूटभर हळद, पाव वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी नारळाचं खोवलेलं खोबरं, अर्धा चमचा दही, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा इंच दालचिनी, मीठ चवीपुरते, अर्धा चमचा तीळ, सजावटीसाठी मूठभर कोथिंबीर.
कृतीः कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग व कांदा परतून घ्या. कांदा सोनेरी रंगावर भाजून घेतल्यानंतर त्यात आलं पेस्ट घालून परता. उग्र वास गेल्यानंतर त्यात धनेपूड, वांगी घाला. वांग्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर वांगी शिजतील अशा बेताने ठेवा. वांगी मऊ झाल्यानंतर त्यात खसखस, लवंग, दालचिनी घालून ढवळा. दही, गूळ व मीठ घालून पुन्हा ढवळा. यात तीळ, हळद, खोबरं, मिरचीपूड, घालून पुन्हा काही मिनिटे ठेवा. चिंचेचा कोळ व थोडंसं पाणी घालून दबदबीत करा. (आपल्याला हवे तसे पातळ ठेवले तरी चालेल.) पाच ते सात मिनिटे झाकण ठेवल्यास खोबरं चांगलं मिक्स होईल. ही करी तयारी झाली की वाटीत काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उकडय़ा भातासोबत किंवा नान अथवा भाकरीसोबत वाढा. गरमागरम चांगली लागेल.
टीपः वांगी बारीक लांबट आकाराची घ्यावीत. त्याचा देठ व हिरव्या पाकळय़ा काढल्या तरी चालतील. वांग्याला मधून लग देऊन चिरावीत. पूर्ण फोडी करू नयेत त्या लवकर विरघळतील.