1400 किलोमीटर अंतरावरून मुलाला घरी आणले
टाळेबंदीच्या दरम्यान सर्वांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. तर एका आईने स्वतःच्या मुलाला त्रासापासून वाचविण्यासाठी 1400 किलोमीटरपर्यंतचा प्रवास स्कुटीने केला आहे. तेलंगणाच्या निजामाबाद येथील बोधानमध्ये एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत रजिया बेगमने टाळेबंदीच्या दरम्यान आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये अडकलेल्या स्वतःच्या मुलाला घरी परत आणण्यास यश मिळविले आहे.
पोलिसांची अनुमती
रजिया बेगम यांनी टाळेबंदीत बाहेर रितसर पोलिसांकडून अनुमती घेतली होती. सर्वप्रथम त्यांनी बोधानच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून स्थितीची कल्पना दिली होती. नेल्लोरपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मार्गात अनेकदा थांबल्या. मार्गात सापडलेल्या प्रत्येक अधिकाऱयाला रजिया यांनी स्वतःच्या स्थितीची कल्पना देऊन तसेच त्यांची अनुमती घेत प्रवास सुरूच ठेवला होता.
मित्राच्या घरी जाणे महागात
रजिया यांचा मुलगा निजामुद्दीन हैदराबादमध्येच एका कोचिंगमध्ये शिकतो. काही दिवसांपूर्वी त्याचा एक मित्र नेल्लोरहून आला होता. परंतु मित्राच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने निजामुद्दीन त्याच्यासोबत नेल्लोर येथे गेला होता. परंतु याच काळात टाळेबंदी लागू झाल्याने तो अडकून पडला होता.
भीती केली दूर
रजिया यांनी अंतर, कारवाई, मार्गातील जंगलांची पर्वा न करता नेल्लोरपर्यंत प्रवास केला आहे. स्वतःच्या मुलाला परत आणण्याच्या ध्यासापोटीच त्यांनी हे दिव्य पेलले आहे. रजिया यांनी 1400 किलोमीटरचा प्रवास मार्गात थांबत-थांबत 3 दिवसांमध्ये स्कुटीने पूर्ण केला आहे. 7 एप्रिल रोजी त्या नेल्लोर येथे पोहोचल्या आणि त्वरित स्वतःच्या मुलाला घेऊन 8 एप्रिल रोजी परत निघाल्या होत्या. 3 दिवसांनी त्या स्वतःच्या घरी पोहोचल्या आहेत.