जीएसटी दर 12 वरुन 18 टक्क्यांपर्यंत वाढविला : 39 वी जीएसटी परिषदेत निर्णय
नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 14 मार्च रोजी 39 वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषद संपन्न झाली. यामध्ये मोबाईल फोनवर आकारण्यात येणारा जीएसटी दर 12 वरून वाढवून 18 टक्के केला असून सोबत मोबाईलसाठी वापरण्यात येणाऱया पार्ट्सवरही आकारला जाणारा जीएसटी 12 वरुन 18 टक्के केला आहे. यामुळे ग्राहकांना मोबाईल खरेदी करताना 6 टक्के जादाची रक्कम द्यावी लागणार आहे. जीएसटीचे सुधारित दर येत्या 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जीएसटी परिषदेतील अन्य निर्णय
– मशीन आणि हातापासून बनविण्यात येणाऱया काडीपेटीवर (माचिस बॉक्स) 12 टक्क्यांनी समान जीएसटी दर लागू होणार
– एअरक्राफ्टच्या देखभालीवर 18 टक्केच्या ठिकाणी 5 टक्के जीएसटी आकारणी
-1 जुलैपासून जीएसटी भरण्यास उशिर केल्यास नेट टॅक्स लायबिलिटीवर 1 टक्के दराने व्याज लागू होणार
– दोन कोटीहून कमी वार्षिक उलाढाल असणाऱया व्यापाऱयांना आर्थिक वर्ष 2018 आणि 2019 च्या वार्षिक परताव्यावरही लेट फी द्यावी लागणार नाही.
-जीएसटीआर-9 सी (जीएसटीआर-सी)ची मर्यादेत वाढ करुन सरकारने लहान व्यापाऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
– वार्षिक 5 कोटीपेक्षा कमी उलाढाल असणाऱयांना वार्षिक रिटर्न फाईलिंगची अंतिम तारीखेत वाढ करुन 30 जून 2020 केली आहे.