काँग्रेस पक्षाचा आरोप
प्रतिनिधी / मडगाव
आम आदमी पक्ष हा जातीयवादी व फुटीरवादी भाजपची बी टीम आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करुन भाजपला फायदा मिळवुन देण्याचे काम आप करीत आहे. निवडणुकां जवळ येत असताना धर्मनिरपेक्ष काँग्रेस विरूद्ध अपप्रचार करुन लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करून भाजपला फायदा करुन देण्याचे काम आम आदमी पक्षाचे नेते करीत आहे असा आरोप दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केला आहे.
राजकीय फायदा मिळविण्यासाठी यापुढील काळात निवडणुका जवळ येत असताना असे अनेक पक्ष व संघटना भाजप जन्माला घालणार असून, मतविभागणी करुन त्याचा फायदा घेण्यासाठी असली कारस्थाने भाजप नेते करणार आहेत. आपने भाजपसाठी डिजिटल मोहिम सुरू केली असून भाजपला नवीन सदस्य मिळवुन देण्याचे मार्केटींग आप करत आहे असे उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यानी म्हटले आहे.
गोमंतकीय जनतेने आपच्या अपप्रचारास बळी पडू नये व काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे सांगून, 2022 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणार व गोव्यात सरकार स्थापन करणार असे ते म्हणाले.
लोकांना केवळ भडकावण्याचे काम करणाऱया आपच्या नेत्यानी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मागील निवडणुकांत एकही जागा जिंकू न शकणाऱया आपने मते फोडुन गोव्यात भाजपला सत्तेत आणण्याचे काम केले असे जोसेफ डायस म्हणाले.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत हे मागील 26 वर्षे मडगाव शहराचे समर्थपणे प्रतिनीधीत्व करीत आहेत. जनसेवा व नम्र स्वभावाने त्यानी मडगावकरच नव्हे तर संपुर्ण गोमंतकीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत. 2007-2012 पर्यंत गोव्यात गठबंधनाचे स्थिर सरकार त्यानी पाच वर्षे चालवले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यानी सुरू केलेल्या सामान्य नागरीकांसाठीच्या योजना अजुनही जनतेच्या लक्षात आहेत असे विजय भिके यानी सांगीतले. गोमंतकीय जनता 2022 च्या निवडणुकांत भाजपला पराभुत करण्यास सज्ज आहे असे जोसेफ डायस म्हणाले. या पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक खरंगटे व ऍड. येमेन डिसोजा हजर होते.