प्रतिनिधी / पणजी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्त मुख्याध्यापक दशरथ परब यांची इन्स्टिटय़ुट मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने या संस्थेवरील संपूर्ण समिती नव्याने स्थापन केली असून दशरथ परब हे त्याचे अध्यक्ष आहेत तर श्रीमती हेमा नाईक, गोरख मांद्रेकर, डॉ. राजय पवार आणि सागर जावडेकर हे या समितीचे सदस्य आहेत. दशरथ परब हे येत्या सोमवारी दि. 15 फेब्रु. रोजी दुपारी अध्यक्षपदाचा पदभार सांभाळतील.
दशरथ परब हे सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षक आहेत. 1976 ते 86 दरम्यान वेळगेच्या श्रीमती हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावलेले. 1986 ते 2010 पर्यंत पाळी-कोठंबी येथील टागोर शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. एक उत्तम कवी व साहित्यिक असलेले दशरथ परब यांनी 5 वर्षे ’उन्मेश’ या मडगावातून निघणाऱया दिवाळी अंकाचे संपादन केलेले आहे.
गोव्यात विविध ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजनात पुढाकार घेणारे दशरथ परब हे यापूर्वी धी म्हापसा अर्बन बँकेचे कित्येक वर्षे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन 1984 मध्ये त्यांना मगो पक्षाने पाळी मतदारसंघात उमेदवारी दिली होती. इंदीरा गांधी हत्येच्या काळात काँग्रेसच्या लाटेमध्ये अत्यल्प मतांनी ते पराभूत झाले. यापूर्वी गोमंतक मराठी अकादमीचे सक्रिय सदस्य म्हणून व विद्यमान सरकारी गोवा मराठी अकादमीवरही ते गेली 7 वर्षे संचालक आहेत. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचेही ते कार्यकारिणी सदस्य आहेत.