क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेली मुंबई सिटी एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. काल मुंबईत मुंबई एरिनावर हा सामना खेळविण्यात आला.
सामन्याच्या 23व्या मिनिटाला जॉर्गे परेरा दियाझने पॅनल्टीवर गोल करून मुंबई सिटीला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱया सत्रात हितेश शर्माने मोहम्मद यासीरच्या पासवर हैदराबाद एफसीचा बरोबरीचा गोल केला. मुंबई सिटी व हैदराबाद हे दोन्ही अनुक्रम पहिल्या व दुसऱया स्थानावर असून त्यांनी स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
अजुनही या स्पर्धेत अपराजित असलेल्या मुंबई सिटी एफसीचे 17 सामन्यांतून 13 विजय व 4 बरोबरीने 43 गुण तर हैदराबाद एफसीचे 16 सामन्यांतून 11 विजय, 3 बरोबरी व 2 पराभवांनी 36 गुण आहेत.
नॉर्थईस्ट युनायटेडचा चौदावा पराभव
गुवाहाटीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत जमशेदपूर एफसीने विजयाची नोंद करताना नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा 2-0 असा पराभव केला.
सामन्याच्या 39व्या मिनिटाला ऋत्विकने गोल करून जमशेदपूरला आघाडी घेऊन दिली तर दुसऱया सत्रात 57व्या मिनिटाला डॅनियल चुक्वूने राफायल क्रिवेल्लारोच्या पासवर संघाचा दुसरा गोल केला. 16 सामन्यांतून 9 गुणांनी जमशेदपूर एफसी दहाव्या तर केवळ 4 गुण असलेला नॉर्थईस्ट युनायटेड एफसी अगदी तळाला म्हणजे अकराव्या स्थानावर आहे.