प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात लवकरच होणाऱया आयएसएल स्पर्धेत ज्या साधन सुविधा लागणार आहेत त्याबाबतची सर्व कंत्राटे गोमंतकीयांना डावलून परप्रांतीयांना देण्यात आली आहेत. असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सांगितले. गोमंतकीयांवर हा अन्याय आहे तो खपवून घेतला जाणार नाही. येत्या चार दिवसाच्या आत सरकारने याच्यावर तोडगा काढला नाही तर ज्या ठिकाणी स्पर्धा होतील त्या ठिकाणी आंदोलन केला जाणार असल्याचा इशाराही संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.
काल सोमवारी येथील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संकल्प आमोणकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जनार्दन भंडारी, वरद म्हार्दोळकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व इतर मान्यावर उपस्थित होते. अगोदर जेव्हा या स्पर्धांचे आयोजन केले जात होते तेव्हा प्रमुख कंत्राटे परप्रांतीयाना दिली जात होती मात्र त्यांचे उपकंत्राटदार गोमंतकीय असायचे त्यामुळे गोमंकीयांना रोजगार मिळत होता. असेही आमोणकर यांनी सांगितले.
या वर्षी आयएसएल स्पर्धा गोव्यात आयोजित केली आहे. त्याच्यातील सर्व मॅच गोव्यातच होणार आहेत. या स्पर्धेसाठी लागणाऱया साधनसुविधा उभरण्याची सर्व कंत्राटे परप्रांतीयांना देण्यात आली आहे. खेळाडूना मैदानापर्यंत आणण्यासाठी वापरण्यात येणाऱया बसगाडय़ा या दिल्ली, केरळ, महाराष्ट्रा तसेच कर्नाटकांतून आणण्यात आल्या आहेत. टॅक्सी, जनरेटर, मैदानावर काम करणारे कामगार तसेच सुरक्षारक्षकही परप्रांतातून आणण्यात येणार आहेत. एकंदरीत स्पर्धा होणार गोव्यात आणि त्याचा खरा फायदा गोमंतकीयांना होण्या ऐवजी परप्रांतीयांनाच होणार आहे असे दिसून येत असल्याचेही आमोणकर यांनी सांगितले. सत्तेत असलेल्या मंत्र्यांना गोमंतकीय जनतेचे काहीच पडून गेलेले नाही तर ते केवळ कमीशन खाण्यात मग्न असल्याची टीकाही आमोणकर यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून सर्वजणच कोविड 19 महासंकटाच्या सावलीखाली दिवस काढीत आहेत. त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर झालेला आहे. जवळजवळ सर्वच व्यवसायांची गती मंदावलेली आहे. अशा स्थितीत आयएसएल स्पर्धा गोव्यात आयोजित केली जात असताना गोमंतकीय टॅक्सीवाले, बसमालक, जनरेटर चालवणारे तसेच काही युवकांना थोडाफार का असेना रोजगार मिळण्याची संधी होती. मात्र सरकारने सर्व कंत्राटे परप्रांतीयांना दिल्याने गोमंतकीयांची ती संधीही सरकरने हिरावून घेतली आहे. वास्तविक कोविड19 ची स्थिती सध्या गोव्यात आहे ती पाहता गोव्यात ही स्पर्धा आयोजित करणे म्हणजे मुर्खपणाच आहे. अनेक खेळाडू देशातील विविध भागातून आलेले आहेत. प्रेक्षकांना मैदानावर जरी प्रवेश दिला जाणार नसला तरी आयोजक व खेळाडू मिळून किमान 200 ते 300 लोक मैदानावर असणार त्यांच्यातील कुणाला कोरोना झाला आणि नंतर तो फैलावला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आमोणकर यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यात रस्त्यांची मोठय़ाप्रमाणात कामे सुरु आहेत मात्र सगळी कंत्राटे परप्रांतीयांना दिली असून त्यांना लागणाऱया सर्व साधन सुविधा त्यांना परप्रांतातूनच आणलेल्या आहेत. रस्त्यासाठी लागणारी माती गोमंतक भूमीतील वापरली जाते मात्र रोजगार परप्रातीयांना दिला जातो असेही आमोणकर यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षापासून राज्यातील खाणव्यवसाय बंद झाल्याने गोमंतकीयांचे हजारो ट्रक बंधस्थितीत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी लागणारे ट्रक परप्रांतातून आणले जात आहे. सरकारच्या या कृतीला गोमंतकीय जनाता विटली असून सरकार विरोधात आवाज उठविणे सुरु झाले आहे. आयएसएलसाठी लागणाऱया बस गाडय़ा, टॅक्सी तसेच मैदानावर कामकरणारे कामगारा गोमंतकीयच असायला हवे तसे न झाल्यास आंदोन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.