केंद्राकडून मान्यता व चायनीज प्रायोजकत्वाबद्दल सदस्यांना माहिती देण्याचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल कार्यकारिणी समितीची महत्त्वाची बैठक आज होत असून त्यात संयुक्त अरब अमिरातीत आयपीएल स्पर्धेला केंद्राकडून परवानगीची स्थिती व आयपीएल स्पर्धेचे चायनीज प्रायोजक व्हिवो कंपनीबाबत माहिती दिली जाईल, असे संकेत आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये स्पर्धेदरम्यान प्रँचायझींना सूचनावली दिली जाणार असून तो ही या बैठकीचा एक भाग असेल.
बीसीसीआय यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यासाठी पूर्ण सुसज्ज असून केंद्राकडून या स्पर्धेला मान्यता, हा ब्रिजेश पटेल यांच्या कार्यकारिणीचा सर्वात महत्त्वाचा मसुदा असणार आहे, असे कळते. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह यांना ‘कुलिंग ऑफ पिरेड’मधून सवलत मिळणार का, या प्रतीक्षेत असले तरी ते देखील आजच्या बैठकीला हजर असतील. खजिनदार अरुण धुमल व संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांचाही बैठकीत समावेश असेल.
‘आमची महत्त्वाची बैठक होणार आहे. पण, अर्थातच प्रत्येकाचे लक्ष गृह मंत्रालय व परराष्ट्र व्यवहार खात्याच्या परवानगीकडे आहे’, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सदस्याने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. टायटल स्पॉन्सरशिपसाठी 440 कोटी रुपये अदा करणाऱया चायनीज प्रायोजक व्हिवो कंपनीच्या कराराबद्दलही या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
आयपीएल कार्यकारिणी बैठकीतील मुख्य मसुदा
@मागील बैठकीतील इतिवृत्ताला मंजुरी देणे
@केंद्राकडून परवानगीबद्दल सद्यस्थितीची माहिती देणे
@स्पर्धेचा नेमका कालावधी निश्चित करणे
@चायनीज प्रायोजकत्वाबद्दल चर्चा करणे
@240 पानांच्या सूचनावलीची माहिती देणे
@सदस्यांना प्रवासाबद्दल माहिती उपलब्ध करुन देणे
@बदली खेळाडूची प्रक्रिया निश्चित करणे
@भ्रष्टाचार प्रतिबंधक पथक निश्चित करणे
@बीसीसीआयचे स्वतःचे वैद्यकीय पथक निश्चित करणे
@ईसीबी पॅटर्नमधील तज्ञांशी बैठक घेण्याबद्दल विचारविनिमय